30 रोजी अर्थसंकल्प, अधिवेशनासाठी 419 प्रश्न : सभापती

0
1197

गोवा खबर:29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन दिवशीय अधिवेशनाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तिन्ही दिवस उपस्थिती लावणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 रोजी ते 2019-20 या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनाला एकूण 419 प्रश्न आल्याचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

आपण तीन दिवस अधिवेशनाला उपस्थिती लावणार, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वत: सांगितले. पहिल्या दिवशी राज्यपालांच्या भाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. मात्र त्यादिवशी आणखी कोणतेही कामकाज होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी उपस्थिती नाही लावली तर चालेल, असा विचार होता. मात्र त्यानी स्वत:च सर्व दिवस उपस्थिती लावणार असल्याचे स्पष्ट केले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रश्नोत्तर शुन्य प्रहर होणार आहे. पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर सरकारी विधेयके असतील. यावेळी 137 तारांकित व 282 अतारांकित प्रश्न असल्याचे सभापतींनी सांगितले.

दुपारनंतरच्या सत्रात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी जी तीन सरकारी विधेयके सादर केली जातील त्यामध्ये गोवा अनुसुचित जाती जमाती आयोग दुरूस्ती विधेयक, गोवा वस्तु आणि सेवा कर दुरूस्ती विधेयक, गोवा सहकारी सोसायटी दुरूस्ती विधेयक यांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अन्य कामकाजाबरोबरच सरकारी विधेयके संमत करण्यात येतील. त्याचबरोबर लेखानुदानाला मान्यता घेण्यात येईल.