
गोवाखबर:देशात महामार्ग माहिती यंत्रणा सुरु करण्यासाठी दक्षिण कोरियासमवेत करार करण्याच्या शक्यता भारत आजमावत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलसंसाधन मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितले. दक्षिण कोरियाच्या द्रुतगती मार्ग माहिती महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या यंत्रणेच्या धर्तीवर भारतात ही यंत्रणा काम करेल.
नवी दिल्लीत, 29 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करतांना, देशातल्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या मंत्रालयाचा प्राधान्यक्रम त्यांनी विषद केला.
रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या कमी करुन ती निम्म्यावर आणण्याचे उद्दीष्ट आपण ठेवल्याचे गडकरी म्हणाले.
रस्त सुरक्षिततेसंदर्भात, आपल्या मंत्रालयाने चार ई म्हणजे शिक्षण, अंमलबजावणी, रस्ते बांधणी आणि आपातकाळातली मदत या चार तत्वांचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले.
रस्ता सुरक्षिततेसंदर्भात जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी रस्ते सुरक्षितता सप्ताह आयोजित केला जातो. यंदाच्या सप्ताहात शालेय बस आणि व्यावसायिक चालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले कुटुंब आणि समाजासाठी रस्ते सुरक्षा सदिच्छादूत बनावे असे आवाहन त्यांनी केले.
‘रस्ते सुरक्षितता’ या विषयावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या निबंध स्पर्धेतल्या यशस्वी 15 शालेय विद्यार्थ्यांना गडकरी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.