25 हजारहुन अधिक लोकांच्या उपस्थितीत होणार सीएए समर्थन सभा:तेंडुलकर

0
621
 गोवा खबर:नागरिकत्व संशोधन कायद्या बाबत गोमंतकीयांच्या मनात कोणतेही गैरसमज नाहीत.भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी पणजी  येथे भव्य जाहिर सभा होणार असून त्याला 27 हजारहुन अधिक लोक हजेरी लावणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी आज दिली.यावेळी प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे, दामू नाईक आणि गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
प्रदेश भाजपतर्फे नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ उद्या पणजी येथील आझाद मैदानावर भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी साडे तीन वाजता कदंब बस स्थानका जवळून सीएए समर्थन रॅलीला सुरुवात होणार आहे.ही रॅली 5 वाजता आझाद मैदानावर पोचल्या नंतर त्याचे जाहिर सभेत रूपांतर होणार आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री,आमदार,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती,यावेळी तेंडुलकर यांनी दिली.
तेंडुलकर म्हणाले,गोमंतकीयांची नागरिकत्व संशोधन कायद्याला साथ आहे.या कायद्यामुळे गोव्यातील कोणालाही घाबरण्याची गरज नाही.हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे,नागरिकत्व काढून घेणारा नाही. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असले तरी लोक त्याला बळी पडत नसल्याचे दिसून आले आहे.काँग्रेसने काढलेल्या मोर्चामध्ये जेमतेम अडीचशे लोकच सहभागी झाले होते.
काँग्रेसचा जनाधार ढासळत असल्याने सीएएला विनाकारण विरोध करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होणार नाही,असेही तेंडुलकर म्हणाले.
पणजी काँग्रेस मंडळाने राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली असल्या बद्दल विचारले असता तेंडुलकर म्हणाले,पणजीच काय पुढे ताळगाव,कुंभारजुवे मध्ये देखील असेच चित्र पहायला मिळणार आहे.
भाजपच्या उत्तर आणि दक्षिण गोवा अध्यक्षांची निवड बिनविरोध पार पडली आहे.येत्या आठ दिवसात नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल,असे सांगून प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीवर आपण समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.