पणजी:फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, एफ टी आय आय, पुणेने आपल्या त्रैमासिक शैक्षणिक नियतकालिक ‘लेन्ससाईट’च्या विशेष आवृत्तीचे गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे औचित्य साधून आज प्रकाशन करण्यात आले.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि एफ टी आय आयचे माजी विद्यार्थी सुभाष घई यांनी ऑक्टोबर-डिसेंबर 2017च्या या विशेष आवृत्तीचे प्रकाशन केले. चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातल्या विद्वत्तापूर्ण आशयघन मजकूरासाठी गेली 26 वर्ष या नियतकालिकाला मान्यता मिळाली आहे. एफ टी आय आय, पुणेचे संचालक भुपेंद्र कॅन्‍थोला आणि अमित त्यागी, अधिष्ठाता (चित्रपट) या समारंभाला उपस्थित होते. चित्रपट संशोधक, अभ्यासक आणि चित्रपट क्षेत्रातल्या तज्ञांच्या संशोधनपर लिखाणाचा या नियतकालिकात समावेश आहे. चित्रपट समजून घेण्याची प्रक्रिया अधिक व्यापक आणि सखोल व्हावी यासाठी अशा आणखी नियतकालिकांची गरज असल्याचे मत घई यांनी यावेळी व्यक्त केले.

वास्तव आणि कल्पकतेविषयीचे प्रश्न चित्रपट कलाकारांच्या मनात रुंजी घालत असतात, असे कॅन्थोला यांनी सांगितले. या विशेष प्रकाशनात विविध लेख, स्मृतिपर लिखाण यांचा समावेश आहे.

एफ टी आय आयच्या माजी विद्यार्थिनी राजूला शहा यांनी या विशेष आवृत्तीच्या अतिथी संपादक म्हणून काम पाहिले आहे.