2022 पर्यंत सर्व घरांना वीज, शौचालय व पाणी मिळणार: प्रमोद सावंत 

0
904
गोवा खबर: भाजप सरकार 2022 पर्यंत राज्यातील सर्व घरांमध्ये वीज, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची जोडणी देण्यासाठी कटिबद्घ आहे .लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि  सरकारच्या पाठीशी उभे राहून साथ द्यावी,असे आवाहन  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सुकूर जिल्हा पंचायत मतदारसंघात झालेल्या कोपरा सभेला मार्गदर्शन करताना केले .
मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यात जी महत्वाची विकास कामे झाली आहेत ती फक्त भाजप सरकारच्या कार्यकाळातच  झाली आहेत. “आमचे सरकार प्रत्येक गावाच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.आमचे सरकार 2022 पर्यंत राज्यातील सर्व घरांमध्ये शौचालये, वीज व पिण्याच्या पाण्याची जोडणी उपलब्ध करून देणार आहे. ‘
 मुख्यमंत्री म्हणाले , येत्या दोन ते चार महिन्यांत प्रत्येक घरात शौचालयांची व्यवस्था केली जाईल.
 गोव्यात फक्त भाजप  सरकारच्या कार्यकाळात विकास कामे झाली असून जनतेची दखल घेतलेली आहे.   राज्यात भाजप सरकारने पायाभूत सुविधांचे जाळे विणताना नवीन पूल, रस्ते आदि  सुविधांना निर्माण करून लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
 गेल्या एक वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल बोलताना सावंत म्हणाले ,गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे विषय मला हाताळावे लागले.म्हादई ते खाण आणि अगदी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यंत अनेक विषय मार्गी लावण्यासाठी माझी धडपड सुरुच आहे.  मी काही जादूगार नाही, मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. मी या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
 मुख्यमंत्री म्हणाले , कर्नाटकातील म्हादई नदी वादावरील लढा गोवा शंभर टक्के जिंकणार यात शंका नाही.
 विकासाच्या प्रकल्पांना विरोध करण्यामागे काही स्वयंसेवी संस्था आहेत.  सरकार या स्वयंसेवी संस्थांमागील भडकावणार्‍यांची चौकशी करत असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मोपा येथे होऊ घातलेल्या ग्रीनफील्ड विमानतळाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री म्हणाले, विमानतळावरून पहीले उड्डाण २०२२ साली होणार आहे. या विमानतळामुळे २०,००० हून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत,असे मुख्यमंत्री म्हणाले.
खासगी क्षेत्रातील रोजगारामध्ये गोमंतकीयांना प्राधान्य दिले जावे,अशी सरकारची इच्छा आहे.त्यादृष्टिने आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.