गोवा खबर:नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (सीएए) समर्थन करण्यासाठी राजधानी पणजीत भाजपने काल शुक्रवारी काढलेल्या समर्थन रॅली आणि जाहीर सभेला 20 हजारहुन अधिक लोकांनी हजेरी लावत सीएएचे जोरदार समर्थन केले. सीएए हा कायदा या देशातील नागरिकांचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी नसून या देशात इतर देशातून धार्मिक छळामुळे 2014 पूर्वी आलेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे स्पष्ट करत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सीएएला विरोध करणाऱ्या राहुल गांधी यांनी सीएए बद्दल 10 ओळी बोलून दाखवाव्या आणि विरोध का हे दोन ओळीत सांगून दाखवावे,असे जाहिर आव्हान दिले.
Overwhelming response by Goans in favor of CAA.#IndiaSupportsCAA#GoaSupportsCAA pic.twitter.com/w1IYfskCgD
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 4, 2020
31 डिसेंबर 2014 पूर्वी या देशात पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. त्याचा वेगळा अर्थ काढून काँग्रेस नेते व इतर विरोधक जनतेला विनाकारण भडकावत असून त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन नड्डा यांनी केले.
सीएए कायद्याबाबत गोव्याची जनता जागृत आहे आणि त्या जागृतीचा परिणाम म्हणूनच समर्थन मोर्चा व सभा झाल्याचे सांगून नड्डा म्हणाले , सीएए प्रकरणी राहुल गांधी तसेच इतर काँग्रेस नेत्यांना काहीच माहीत नाही.काँग्रेसने फक्त सीएए विषयावरून स्वार्थी तसेच देशविरोधी घाणेरडे राजकारण चालवले असून त्यास जनतेने बळी पडू नये, असे नड्डा म्हणाले. मोदी यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. जम्मू काश्मिरमधील 370 कलम रद्द केले व आता सीएए कायदा आणला. गेली 70 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला हे निर्णय करण्याची हिंमत झाली नाही. 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरची जनता आनंदात असल्याचा दावा नड्डा यांनी केला.
LIVE: Shri @JPNadda addresses a public meeting in support of CAA in Goa. #IndiaSupportsCAA https://t.co/mPXCpxQdvi
— BJP (@BJP4India) January 3, 2020
सीएए या कायद्यामुळे गोव्यातील जनतेने घाबरु नये. त्यांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. गोव्याची जनता या कायद्यास पाठिंबा देत असल्याचे पणजीतील या विराट रॅली आणि सभेने सिद्ध झाले आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या सीएए विरोधी सभेला जनतेने पाठिंबा दिला नव्हता, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केला.







पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून काँग्रेसला गेल्या 70 वर्षात जे जमले नाही ते मोदींनी केले. गोव्याची जनता पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारच्या मागे समर्थपणे उभी आहे. तसेच सीएएच्या विरोधात गोमंतकीय जनता नाही, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. जनतेने या सीएए समर्थनासाठी आखलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला म्हणून डॉ. सावंत यांनी जनतेला धन्यवाद देऊन आभार मानले.
सीएएच्या विषयावरुन काँग्रेस पक्ष स्वार्थी राजकारण करीत आहे. जनतेला विनाकारण भडकावत आहे. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे. कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे. त्यामुळे कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सभेत बोलताना दिली.
गेली अनेक वर्षे जे काँग्रेसला जमले नाही ते भाजपने व पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी करुन दाखवले आहे. परंतु त्याचा वेगळा अर्थ लावून काँग्रेस पक्ष सीएए प्रकरणी जनतेत गैरसमज पसरवत आहे. त्यास जनतेने बळी पडू नये, गोव्यातील कुणाच्याच नागरिकत्वाला कोणताही धोका नाही. गोमंतकीयांनी यापुढेही मोदींच्या पाठीमागे असेच उभे रहावे, असे आवाहन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
भाजपच्या गोवा प्रदेश अध्यक्ष या नात्याने हे आपले शेवटचे भाषण असून आता लवकरच नवीन अध्यक्ष नेमला जाणार आहे. गेली सात वर्षे सहकार्य केले म्हणून आपण सर्वांचे आभार मानतो, असे तेंडुलकर म्हणाले.
पाटो येथील पर्यटन भवन येथून भाजपतर्फे सीएएच्या समर्थनार्थ रॅली सुरु झाली. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेकांच्या हातात भाजपचे तसेच राष्ट्रध्वज फडकत होते. अनेकांनी सीएएला समर्थन देणारे फलक हाती घेतले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर व बाबू कवळेकर तसेच इतर मंत्री आणि आमदार रॅलीत सहभागी झाले होते. पाटो पूल, चर्च चौक, राजधानी हॉटेल मार्गे हा मोर्चा आझाद मैदानावर आला आणि तेथे त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले.
राजेंद्र आर्लेकर यांनी सभेच्या सुरूवातीला सर्वांचे स्वागत केले. हा कायदा व त्यातील तरतूद देशातील लोकांना लागू होत नाही. इतर तीन देशातून जे अल्पसंख्याक लोक भारतात आले व राहतात त्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा असल्याचे सांगून जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सभेचे सूत्रसंचालन दामोदर नाईक यांनी केले. सभेच्या सुरुवातीस पणजीचे महापौर उदय मडकईकर व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी पुष्पगुच्छ देऊन नड्डा यांचे स्वागत केले.
