0
1128

मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या राजकारणात परतल्यापासून संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडं होता. संरक्षणमंत्रिपदासारखं महत्त्वाचं पद असं अधांतरी ठेवल्यामुळं सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. काश्मीर खोऱ्यात होणारे पाकिस्तानपुरस्कृत हल्ले व चीनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही हा मुद्दा प्रकर्षानं पुढं आणला होता. त्यामुळं आजच्या फेरबदलात याबद्दल निर्णय होणं निश्चित होतं. मात्र, सुषमा स्वराज किंवा अन्य एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला ही जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. ती फोल ठरवत मोदींनी सीतारामन यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडं याआधी उद्योग व वाणिज्य हे खातं होतं. गेली तीन वर्षे राज्यमंत्रीपदी असलेल्या सीतारामन यांना ‘टॉप फाइव्ह’मधील खाते देत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा परिचय दिला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरणार आहेत.