15 दिवसांच्या बंदी नंतर गोव्यात परराज्यातून मासळीची आयात सुरु

0
815
गोवा खबर : फॉर्मेलिन प्रकरणा नंतर परराज्यातून आयात मासळीवर पंधरा दिवसांपूर्वी घातलेली बंदी आता उठवण्यात आली आहे.त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटेपासून गोव्यात परराज्यांमधून मासळीची आयात सुरू झाली. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिका-यांच्या पथकाने पत्रदेवी आणि पोळे सीमेवर मासळीची तपासणी केल्या नंतरच  वाहने गोव्यात सोडण्यात आली. गोव्यात येणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन या घातक रसायनाचा वापर झालेला असू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच सीमेवर मासळीचे नमूने घेऊन ते तपासले जात आहेत. यापूर्वी परराज्यांतून येणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन असते अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाल्यानंतर सरकारने मासळीची आयात थांबवली होती. 18 जुलैपासून आयात बंद होती.
 गोव्यात 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंदी असते.त्यातच फॉर्मेलिन प्रकरण उघडकीस आल्यामुळे लोकांनी मासे खाणे बंद केले होते. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला होता. 1 ऑगस्टपासून जरी मासेमारी सुरू झाली तरी, अजुनही गोव्यातील ट्रॉलर्स समुद्रात गेलेले नाहीत.  ट्रॉलरवर काम करणारे कामगार अजून आलेले नसल्याने रापण आणि ज्या ट्रॉलर्सनी मासेमारी सुरु केली त्यांच्यावरच लोकांना अवलंबून रहावे लागत होते.
परराज्यांतील मासळीची तपासणी करावी व मगच वाहने गोव्यात सोडावीत असे आरोग्य व मच्छीमार खात्याने ठरवले आहे. मात्र पोळे व पत्रदेवी या दोनच मार्गाद्वारे गोव्यातून मासळीची वाहने येतील असे सरकारने जाहीर केले व त्यानुसार व्यवस्था केली.आज पोळे सिमेवर 14 तर पत्रदेवी सिमेवर 3 मासळी वाहू ट्रकांची तपासणी केल्या नंतरच त्यांना आत सोडण्यात आले. खात्याचे अधिकारी , पोलिस यंत्रणा व वाहतूक अधिकारी यांनी मिळून राज्याच्या सीमेवर मासळीची वाहने अडवून मासळीची तपासणी करणे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे सुरू केले. मासळीचे ट्रक थांबवून तिथेच अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिका:यांनी मासळीची तपासणी केली मात्र कुठच्याच मासळीत फॉर्मेलिन आढळले नाही,असे सरकारतर्फे सांगण्यात आले.