144 कलम किंवा आणखी काहीही गोवेकरांना रोखू शकणार नाही : तेलेकर

0
301
गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकांची सतवणूक करण्यापेक्षा लोकांच्या समस्या ऐकून घ्यायला हव्यात. कोविडचे कारण पुढे करून दक्षिण गोव्यात 144 चे कलम लावणे म्हणजे लोकांना जाणूनबुजून सतावण्याचा प्रकार आहे. सरकारने कितीही प्रयत्न केला तरी लोकांना नको असलेले प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा आम आदमी पक्षाचे प्रवक्ता संदेश तेलेकर यांनी दिला आहे.
तेलेकर म्हणाले, दिल्लीहून रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित होणाऱ्या प्रकल्पांच्या विरोधात लोकांची चळवळ आणि विरोध वाढत असल्याने सरकार घाबरलेले आहे. गोवा आणि गोवेकरांच्या विरोधात हे प्रकल्प पुढे दामटण्यात येत आहेत. कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झालेली असताना कलम 144 लावण्याची काहीही गरज नव्हती.
मायणा कुडतरी पोलीस स्थानकात दोन सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यामुळे त्या कृतीचा विरोध करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. त्याला घाबरुनच हे कलम मुद्दाम लावण्यात आले आहे. कलम 144 लावण्यापेक्षा लोकांच्या मागणीप्रमाणे अदानी आणि इतरांच्या विरोधात एफआयआर दाखल अथवा नोंद करण्यात यावी, अशी मागणी तेलेकर यांनी केली आहे.
कलम 144 लावण्याची धमकावण्याची कृती लोकांना सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यापासून परावृत्त करू शकणार नाही, असे सांगुन तेलेकर म्हणाले, आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्याने लोक जास्त भडकले आहेत. लोकांच्या विरोधात असलेले अलोकशाही सरकार उलथवून टाकण्यास लोकच पुढाकार घेतील, हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात ठेवायला हवे.