12 व्या गोमचिमच्या उद्धाटनाला शोमॅन सुभाष घई

0
2445
गोवा खबर:विन्सन वर्ल्ड तर्फे आज 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली.28,29आणि 30 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक सुभाष घई उपस्थित राहणार आहेत.
विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत आज 12 व्या गोमचिमची घोषणा करण्यात आली.28 जून रोजी उद्धाटन सोहळा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती ज्ञानेश मोघे यांनी दिली.
कृतज्ञता पुरस्कार सुमित्रा भावे  यांना
यंदाचा कृतज्ञता पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे.
दर्जेदार सिनेमांची मेजवानी
प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सतर्फे निर्मित पहिल्याच विजेता या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन महोत्सवात होणार आहे.घई यांच्या मुक्ता आर्ट्स तर्फे पहिलाच मराठी सिनेमा बनवण्यात आला असून त्याचे प्रदर्शन घई यांच्या  इच्छेनुसार महोत्सवात केले जाणार असल्याची माहिती,महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी दिली.
याशिवाय 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात मुळशी पॅटर्न(दिग्दर्शक प्रवीण तर्डे)बस्ता(दिग्दर्शक तानाजी धाडगे) होडी(दिग्दर्शक गजेंद्र अहीरे)नाळ(दिग्दर्शक सुधाकर रेड्डी)वेडिंग चा सिनेमा(दिग्दर्शक सलिल कुलकर्णी)कागार(दिग्दर्शक मकरंद माने)सुर सपाटा(दिग्दर्शक मंगेश काथाकाळे) भोंगा(दिग्दर्शक शिवाजी पाटील)दिठी(दिग्दर्शक सुमित्रा भावे)इमेगो(दिग्दर्शक करण चव्हाण)खटला बिटला (दिग्दर्शक परेश मोकाशी)म्होरक्या(अमर देवकर)मिरांडा हाउस(दिग्दर्शक राजेंद्र तालक)पाणी(दिग्दर्शक आदिनाथ कोठारे)चुंबक(दिग्दर्शक संदीप मोदी)आरोन(दिग्दर्शक ओमकार शेट्टी),अहिल्या(दिग्दर्शक राजू पार्सेकर) आदी सिनेमांची मेजवानी मराठी चित्रपट प्रेमींना चाखता येणार आहे.
4 लघुपट होणार प्रदर्शित
यावेळी चार लघुपट देखील महोत्सवात दाखवले जाणार आहेत.यामध्ये पाम्फलेट(दिग्दर्शक शेखर रणखांबे)पोस्टपार्टुम (दिग्दर्शक विनोद कांबळे),गोधुळ(दिग्दर्शक गणेश शेलार)आणि आई शप्पथ (दिग्दर्शक गौतम वझे) यांचा समावेश आहे.
दिग्गज कलाकार लावणार हजेरी
12 व्या गोमचिममध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे कलाकार,दिग्दर्शक,निर्माते, तंत्रज्ञ हजेरी लावणार आहेत.आता पर्यंत पार पडलेल्या 11 गोवा मराठी चित्रपट महोत्सवांना विक्रम गोखले, अमोल पालेकर,सचिन पिळगावकर,नाना पाटेकर,मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर,रवी जाधव,सचिन खेडेकर,वर्षा उसगावकर यांच्या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलेली आहे.
यंदा कला अकादमी बरोबरच आइनॉक्स,मॅकेनिझ पॅलेस 1 आणि 2 तसेच वास्को येथील 1930 या सिनेमागृहांमध्ये सिनेमांचे प्रदर्शन होणार आहे.महोत्सवासाठी नोंदणी पुढच्या आठवडयात पणजी, म्हापसा,फोंडा,मडगाव आणि वास्को बरोबरच बुक माय शो डॉट कॉमवर सुरु होणार आहे.
यंदाचा महोत्सव मराठी चित्रपट प्रेमींसाठी विशेष ठरणार आहे.त्यासाठी नियोजन सुरु आहे.पुढच्या आठवडयात त्याची घोषणा केली जाईल,अशी माहिती महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी दिली.
यावेळी ज्ञानेश मोघे,श्रीपाद शेट्ये,उदय म्हांबरे,सिद्धेश म्हांबरे उपस्थित होते.