12व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्यासाठी मराठी तारे जमीं पर

0
2082
गोवा खबर:  गोवा खाण व्यवसाय, पर्यटन व्यवसायसाठी ओळखला जायचा परंतु आता चित्रपट महोत्सवासाठीही ओळखला जात आहे.इफ्फी बरोबरच गोवा मराठी चित्रपट महोत्सव नावारूपास आला आहे.त्यातून गोव्यात चित्रपट संस्कृती रुजली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

  कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन झाले. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, खासदार संजय राऊत, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे, विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये व श्रीपाद शेट्ये तसेच सिनेसृष्टीतील मान्यवर उपास्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
  गोव्यासारख्या राज्यात 12 वर्षापासून सलग मराठी चित्रपट महोत्सव साजरा करणे ही खुप कौतुकास्पद व अभिमानस्पद बाब आहे. गोव्याचे महाराष्ट्रावर खुप ऋण आहे. गोव्याने अनेक महान कलावंत महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीला दिले. चित्रपटाची निर्मिती ही महाराष्ट्रात जन्मलेल्या दादासाहेब फाळके यांनी केली. असे असूनही आज मराठी चित्रपटाने व्यवसायिकदृष्टया पाहिजे तसा विकास केला नाही, यावर विचारमंथन करणे गरजेचे आहे,  असे मत खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.
 यावेळी  सुमीत्रा भावे यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.त्याशिवाय सचिन पिळगावकर,वर्षा उसगावकर,मृणाल कुलकर्णी,प्रसाद ओक यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 आज मी जो काही आहे याचे पूर्ण श्रेय महाराष्ट्राला व तिथल्या सिनेजगताला जाते. यादरम्यान मी अनेक दर्जेदार चित्रपट तयार केले. अनेकदा पुरस्कार देखील प्राप्त झाले. परंतु या पूर्ण प्रवासात माझ्या सोबत फक्त मराठी माणूस खंबीरपणे उभा राहिला. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, वामन भोसले, तसेच अनेक लेखक आहेत. यांच्यासोबत प्रदिर्घकाळ काम केले. मी चित्रपट तयार करायला महाराष्ट्रात शिकलो. माझी बायको देखील पुण्याची आहे. त्यामुळे मला वाटते मी यांच्या सर्वांच्या आशिर्वादानेच घडलो आहे, असे मनोगत दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
  चित्रपट हा फक्त करमणुकीचे साधन नव्हे तर माणूस व समाज घडविण्याचे उत्तम साधन आहे. आजकाल चॅनल्सवर ज्या मालिका येतात यामध्ये काम करणारे खलनायक व नायिका पाहताना खूप वाईट दिसते. याचा घरातील व्यक्तींवर, मुलांवर याचा काय परीणाम होत असावा. आम्ही वाईट गोष्टी दाखविल्या की लोकांची मने घडताना देखील वाईट होतात, त्यामुळे चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी व सत्य गोष्टी दाखविल्या पाहिजेत, असे मनोगत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुमित्रा भावे यांनी कृतज्ञता पुरस्कारावर बोलताना व्यक्त केले.
 चित्रपट महोत्सवाला सिनेसृष्टीतील कलाकार प्रसाद ओक, सुशांत शेलार, नेहा महाजन, भार्गवी चिरमुले, गजेंद्र अहिरे, मकरंद माने, भरत जाधव, संजय जाधव, शिवानी पाटील, मिलींद गुणाजी, मृणाल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर, राजू पार्सेकर, प्रविण तरडे, भारत गणेशपुरे, अलका कुबल, यासारखे अनेक कलाकार खास उपस्थित होते.
उद्धाटन सोहळ्या नंतर फक्त मराठी चॅनलच्या वतीने कॉमेडी आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.