​​कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये ‘इंडियन पॅव्हिलियन’ चे उद्‌घाटन

0
962
कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये इंडियन पॅव्हिलियनच्या उद्‌घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले भारतीय शिष्टमंडळ

भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी

कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये ‘इंडियन पॅव्हिलियन’ चे उद्‌घाटन झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर उपस्थित होते तसेच फ्रान्समधील भारताचे राजदूत विनय मोहन कवात्रा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अशोक कुमार परमार, प्रसिद्ध कवी, लेखक आणि भारतीय चित्रपट प्रमाणपत्र (परीनिरिक्षण) केंद्रीय मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी, मंडळाच्या सदस्य आणि निर्मात्या दिग्दर्शिका वाणी त्रिपाठी टिकू, जेरोम कुरेशी, चित्रपट अभिनेती हुमा कुरेशी, चित्रपट निर्माते शाजी करुण, जाहनु बरुआ, भारत बाला उपस्थित होते. कान्स चित्रपट महोत्सवात भारतामध्ये तयार होणाऱ्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे कार्य भारतीय प्रतिनिधी मंडळ यावर्षी करणार आहे.

 

आपल्या देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब देशामध्ये तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये दिसून येत असते, असे मत विनय मोहन कवात्रा यांनी यावेळी व्यक्त केले. सध्या भारतामध्ये तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात खूप वेगाने प्रगती होत आहे. या दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येत आहे. त्याचेही प्रतिबिंब आजच्या चित्रपटांमध्ये दिसून येत आहे. युरोपातील आणि संपूर्ण जगाच्या चित्रपटसृष्टीला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे कान्स चित्रपट महोत्सव आहे असे प्रतिपादन जेरोम पिलार्ड यांनी यावेळी केले.

कान्स चित्रपट महोत्सव आणि फ्रेंच चित्रपट उद्योग यांच्याशी भारताचे खूप चांगले संबंध आहेत त्यामुळे भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे चित्रपट निर्मिती उत्तम होऊ शकते, असे मत वाणी त्रिपाठी टिकू यांनी यावेळी व्यक्त केले. भारतात बनलेले ‘तमाशा’, ‘बेफिकिर’ सारखे चित्रपट दोन देशांची कथा सांगतात.

चित्रपट व्यवसायात नव्याने येणाऱ्या तरुण चित्रपट कर्त्यांसाठी ‘कान्स’ प्रमाणेच विविध लहान लहान चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले तर त्यांची चित्रकृती अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे, असे मत कवी,लेखक प्रसून जोशी यांनी उद्‌घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.