९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पणजीमध्ये टपाल तिकीट प्रदर्शन

0
910

 

गोवा खबर:भारतीय टपाल विभाग, गोवा तर्फे पणजी मध्ये ‘गोवापेक्स २०१९’ या नावाने टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ मेनेझेस ब्रागांझा सभागृहामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून याची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७ अशी असणार आहे, अशी माहिती पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन विनोद कुमार, गोवा क्षेत्र व वरिष्ठ टपाल अधीक्षक अर्चना गोपीनाथ यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

यामध्ये एक स्पर्धा वर्ग व दुसरा निमंत्रित वर्ग असणार आहे. स्पर्धा वर्गात ४१ स्पर्धक असून त्यामध्ये ११ शाळांचा सहभाग आहे, तर १२ निमंत्रित आपला संग्रह येथे प्रदर्शित करतील. स्पर्धा विभागासाठी पारितोषिके देखील आहेत.

ऑलिव्ह रेडली कासव या समुद्री जीवावर विशेष प्रदर्शन असणार आहे, हे कासव गोव्यामध्ये देखील आढळून येतात.याशिवाय गोव्यातील किल्ले व घुमट वाद्य यांनादेखील या प्रदर्शनामध्ये विशेष स्थान दिले जाणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर करणार असून, या तीन दिवसात कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर, गायिका सोनिया शिरसाट, घुमट वादक कांता गौडे इत्यादी मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.

या प्रदर्शनाचा सर्व नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन विनोद कुमार यांनी केले आहे.