होली राइट्स चित्रपटात मुसलमान महिलांच्या संघर्षाचे चित्रण : फरहा खातून

0
371
गोवा खबर : “होली राइट्स ही तिहेरी तलाक विरुद्धच्या चळवळीची कथा आहे, मुस्लीम समाजातच महिलांचा आवाज दडपणाऱ्या शक्तींविरुद्ध मुसलमान महिलांनी केलेला संघर्ष तसेच आपल्या राजकीय विचारांनुसार आंदोलन करताना त्यांना समाजाच्या बाहेरून होणाऱ्या विरोधाविरुद्ध मुसलमान महिलांनी पुकारलेल्या संघर्ष यात चित्रित केला आहे. या चित्रपटामध्ये विशेषतः मुस्लिम समुदायावर भाष्य केले असले तरीदेखील महिलांच्या शोषणाची समस्या ही सगळ्या समाजात सारखीच आहे असे मला वाटते. जर आपल्याला काही साध्य करायचे असेल तर ते आपण करू शकतो हा संदेश देखील या चित्रपटातून दिला आहे. 51 व्या इफ्फीमध्ये भारतीय पॅनोरामा नॉन फीचर फिल्म विभागात प्रदर्शित झालेल्या होली राइट्स या चित्रपटाविषयी दिग्दर्शक फराह खातून बोलत होत्या. गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, सहाव्या दिवशी (21 जानेवारी 2021) आयोजित पत्रकार परिषदेत त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

हा चित्रपटात धर्मासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या शोषणाविषयी भाष्य करतो. बालपणी तिच्यावर असलेला पगडा आणि तिला आलेल्या अनुभवातून हा चित्रपट साकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

या विषयाच्या निवडीबद्दल त्या म्हणाल्या: “चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावरून देशात गदारोळ सुरु असताना हा विषय निवडला. जेव्हा कधी धर्मात पितृसत्ताक परंपरेवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो प्रयत्न नेहमीच फेटाळून लावला जातो. ”

 

होली राइट्स हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे, हा पाच वर्षाचा प्रवास आहे,” असे त्या म्हणाल्या.