होम आयसोलेशन कीट वरील मास्क नसलेल्या डाॅ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणेंच्या फोटोनी भाजपचा प्रसिद्धीसाठी हपापलेला भ्रष्ट चेहरा उघड : अमरनाथ पणजीकर

0
261
गोवा खबर : आजाराचा बाजार करणाऱ्या व प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजप सरकारचा भ्रष्ट चेहरा आरोग्य खात्याने आज जारी केलेल्या होम आयजोलेशन कीट वरील मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मास्क नसलेल्या फोटोनी उघड झाला आहे. परमेश्वराने प्रत्येक गोमंतकीयाला उत्तम आरोग्य द्यावे व भाजप सरकारच्या ह्या कीट पासुन लोकांना दूर ठेवावे अशी आम्ही प्रार्थना करतो असे सांगुन काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी सरकारवर बोचरी टिका केली आहे.
कोविड महामारी सुरू झाल्या पासुन भाजपने भ्रष्टाचार करुन माया जमविण्याची एकही संधी सोडली नाही. लोकांना आरोग्य सुवीधा देण्याचे सोडुन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व इतर सर्व मंत्री सरकारी तिजोरी लुटण्यातच व्यस्त होते, असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.
राष्ट्रव्यापी लाॅकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केल्यानंतर, मार्च महिन्यात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी ठेवण्याची केंद्र सरकारची नियमावली असतानाही मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी भाजपवाल्यांना साठेबाजी करण्यास वेळ मिळावा म्हणुन गोव्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. लोक दुधाची पिशवी शोधत सर्वत्र फिरत असताना, उप-मुख्यमंत्री बाबू कवळेकर हे जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करीत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर झळकली याची आठवण पणजीकर यांनी करुन दिली.
संपुर्ण गोवा ज्यावेळी सामाजीक कोविड चाचणी करण्याची मागणी करत होता त्यावेळी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी हट्टाला पेटुन सामाजीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला व ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना १५ लाख गोमंतकीयांसमोर जाण्यास भाग पाडले. आज पर्यंत सदर सर्वेक्षणातुन नक्की काय बाहेर आले हे कुणालाच माहित नाही, असे पणजीकर म्हणाले.
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. जितेंद्र देशप्रभू यांना आलेला संशयास्पद मृत्यु व त्यांनतर एका डाॅक्टरचे केलेले निलंबन, सदर डाॅक्टर दिवंगत झालेल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याचा नातेवाईक असल्याने मागे घेण्यात आले याकडेही पणजीकर यांनी लक्ष वेधले आहे.
पणजीकर म्हणाले, केवळ आपल्या स्वार्थासाठी व कमिशन खाण्यासाठी सरकारने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुरू करण्यास विलंब केला व खासगी इस्पितळांना भरमसाठ बिले आकारुन कोविड रुग्णांवर उपचार करण्याची मुभा दिली.
लोकायुक्तानी भ्रष्टाचाराचे प्रशस्तीपत्र दिलेला बांधकाम कामगार कल्याण निधी घोटाळा कोविड महामारी काळातच भाजपने केला, असा आरोप करून पणजीकर म्हणाले,
सर्व हाॅटेल्स व शॅक्स बंद असतानाही पर्यटन मंत्री बाबू आजगांवकरानी पर्यटन व्यावसायीकांकडे अर्थपूर्ण तगादा लावला.
गोव्यातील जनता उघड्या डोळ्यानी भाजपचा भ्रष्ट कारभार पाहत असुन, २०२२ च्या निवडणुकीत लोक भाजपला योग्य धडा शिकवतील, असे पणजीकर म्हणाले.