होमिओपॅथी एक प्रभावी आणि स्वस्त उपचार पद्धती- श्रीपाद नाईक

0
1039

गोवा:होमिओपॅथी ही एक प्रभावी आणि स्वस्त उपचार पद्धती असून होमिओपॅथीच्या प्रचारासाठी सरकार कटीबद्ध आहे. भारतामध्ये सर्वात पसंतीची असलेली ही उपचार पद्धती सर्वसाधारण आजार किंवा दीर्घकालीन आजारांकरिता वापरली जाते, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज मडगाव येथे केले. होमिओपॅथी मेडिकल असोशिएशन ऑफ इंडियाच्या गोवा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय 20व्या राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेच्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

आतापर्यंत आमच्याकडे 200 महाविद्यालये, 8000 सार्वजनिक क्षेत्रातील दवाखाने व सुमारे 3 लाख नोंदणीकृत डॉक्टर यांची नोंद झाली आहे. या महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर आयुष मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे. पायाभूत सुविधा सुधारव्यात म्हणून महाविद्यालयीन अधिकाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी नियमित तपासणी, अभिप्राय आणि संवाद हे मार्ग अंमलात आणले जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय होमिओपॅथीला स्थान मिळवून देण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. होमिओपॅथी मेडिकल असोशिएशन ऑफ इंडिया यामध्ये सरकारला मदत करू शकते. असोशिएशन होमिओपॅथीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेऊन या संस्थांमधील प्रवेश, मान्यता प्रमाणपत्र आणि परीक्षा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आढळून आल्यास सरकारला कळवू शकते, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

गेल्या तीन वर्षात आयुष मंत्रालयाने वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेऊन होमिओपॅथी आणि त्याद्वारे उपचार देणाऱ्या डॉक्टरांना हृद्य व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग, मधुमेह, कर्करोग आणि स्ट्रोक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, माता-बाल आरोग्य अशा विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सामावून घेतले आहे. यापुढेही आरोग्य केंद्रांमधून प्राथमिक उपचार देण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांची सेवा घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

नाईक यांनी सूचित केले की, आगामी काळात संशोधन, शिक्षण आणि रुग्णांची काळजी या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा सरकारचा मानस आहे. हे पुरस्कार दरवर्षी 10 एप्रिल म्हणजे जागतिक होमिओपॅथी दिनी प्रदान करण्यात येतील.

होमिओपॅथीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनासाठी केंद्र सरकार पूर्ण पाठींबा देत असून आयुष मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सेन्ट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे, असे नाईक यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने इंग्लंड, अमेरिका, अर्जेन्टीना, कॅनडा, आर्मेनिया, मेक्सिको, जर्मनी आणि ब्राझील या राष्ट्रांमधील नामांकित संघटनांशी सामंजस्य करार केला आहे. असे करण्यामागे संयुक्त संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, माहितीची देवाणघेवाण करणे, दस्तऐवजीकरण व प्रकाशने, संयुक्त परिषदा आयोजित करणे तसेच अभ्यासक, शास्त्रज्ञ, शिक्षण व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्या प्रशिक्षणासाठी तज्ञांची देवाणघेवाण करणे, हा उद्देश आहे.

कॉलरा तसेच साथीची लागण रोखण्यासाठी होमिओपॅथीने केलेल्या कार्याचे कौतुक करताना नाईक म्हणाले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत जीवसृष्टीतील सजीवांच्या नवीन जाती शारिरीक व्यंग निर्माण करीत आहेत; अशावेळी होमिओपॅथि महत्वाची भूमिका निभावू शकते. याशिवाय डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि स्वाईन फ्लू यासारख्या रोगांचा निपटारा करण्यासाठी देखील सरकारला मदत करू शकते. याकरिता स्थानिक तंत्रज्ञानाचा आणि औषधांचा विकास करायला हवा जे शास्त्रीय आणि कार्यक्षम असतील तसेच रास्त दरात उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

देशभरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी दोन दिवसांच्या या राष्ट्रीय परिषदेत भाग घेतला होता. यातील काही नामवंत तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर काही कनिष्ठ डॉक्टरांनी आपल्या अनुभवांवरून तयार केलेले शोधनिबंध सादर केले.

SHARE
Previous articleRaksha Mantri Visits Goa Naval Area
Next article