होमिओपथी उपचारपद्धतीच्या प्रसारासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न- श्रीपाद नाईक

0
1500

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दुसऱ्या जागतिक होमिओपथी परिषदेचे उदघाटन

 गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पणजीत दुसऱ्या जागतिक होमिओपथी परिषदेचे उदघाटन करण्यात आले. होमिओपथी संशोधनामध्ये जागतिक पातळीवर भारताचे पाचवे स्थान असल्याचे श्री नाईक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. देशात सध्या होमिओपथीची 200 महाविद्यालये आणि 26 संशोधन केंद्र असलेली एक स्वायत्त संस्था आहे. भारत होमिओपथीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर मोठे योगदान देऊ शकतो, असे श्री नाईक आपल्या बीजभाषणात म्हणाले.

उद्योग आणि होमिओपथी महाविद्यालयांनी संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले. पुढे बोलताना श्री नाईक म्हणाले की, पाश्चात्य जग सध्या अँटीबायोटीक्स, पेन किलर्स, अँटी डीप्रेसन्टस, अँटी हायपरटेन्सिव यामुळे चिंतीत आहे. होमिओपथी आपल्या सुरक्षितपणामुळे यासर्व प्रकारांसाठी एक समर्थ पर्याय ठरु शकते. असंसर्गजन्य रोगांना एकात्मिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून बरे करण्याची ताकद होमिओपथी उपचारपद्धतीत आहे.

सरकारने ड्रग्स अँड कॉस्मेटीक्स कायदे 1945 मध्ये सुधारणा करुन होमिओपथी औषध विक्रीच्या परवाना पद्धती सुलभ केली. त्यामुळे जत्रा, प्रदर्शनाच्या जागी होमिओपथी औषधांची विक्री करणे सोपे झाले. तसेच आणखी एक दुरुस्ती करु ऍलोपथी औषधविक्री केंद्रांवर होमिओपथी औषध विक्रीचाही परवाना देण्यात आला. यामुळे देशात होमिओपथी औषधांचा प्रसार आणि प्रचार होईल, असे श्री नाईक म्हणाले.

तीन दिवस चालणाऱ्या दुसऱ्या जागतिक होमिओपथी परिषदेसाठी जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, ब्राझील, बेल्जिअम, दक्षिण आफ्रिका, अर्जेन्टीना, रशिया, ग्रीस, ऑस्ट्रीया, क्यूबा, कतार, क्रोएशिया, मलेशिया, जपान, हाँगकाँग आणि श्रीलंका या देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे.

परिषदेच्या उदघाटनाप्रसंगी आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रोशन जग्गी, युरोपिय होमिओपथी समितीचे अध्यक्ष आणि फ्रान्सचे प्रतिनिधी डॉ हेलेनी रेनॉक्स, डॉ रॉबर्ट वॅन हॅसलेन, संचालक, वर्ल्ड इंटिग्रेटेड मेडिसीन फोरम, डॉ राज मनचंदा, महासंचालक, सीसीआरएच आणि डॉ अनिल खुराणा, उपमहासंचालक यांची उपस्थिती होती.