हेल्मेट न वापरणाऱ्यांनी अवयवदान करावे: पोलिस महासंचालकांचा उपरोधिक सल्ला

0
752
 गोवा खबर: हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांनी अवयवदान करावे.कितीही विरोध झाला तरी राज्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी आज स्पष्ट केले.
सध्या ट्राफिक सेंटिनल योजने वरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे.ट्राफिक सेंटिनलला मारहाणीचे प्रकार देखील घडत आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी या योजनेला जोरदार विरोध केला होता.
या पार्श्वभूमीवर आजपासून सुरु झालेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ट्राफिक सेंटिनल योजनेला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळीबोलताना पोलिस
महासंचालकांनी दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात घडलेल्या अपघातात हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. उलट हेल्मेट घातलेल्या व्यक्ती बचावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ हेल्मेट न घालता दुचाकीची सवारी केली आणि दुर्दैवाने अपघात घडला तर वाचण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर नेहमी करावा. ज्या कुणी हेल्मेटचा वापर करणारच नाही, असे ठरविले आहे अशा लोकांनी अवयवदानासाठी नावनोंदणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
काल एका कार्यक्रमात बोलताना पोलिस महासंचालकांनी गोमंतकीयांची डोकी लोखंडाची बनलेली असतील तर त्यांनी हेल्मेट  घालू नये असा उपरोधिक सल्ला दिला होता.सर्वसामान्य लोक आणि लोकप्रतिनिधींचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिस महासंचालक सध्या जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या योजने बाबत फेरविचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.