हिरवागार आणि स्वच्छ गोवा हिच पर्रिकर यांना श्रद्धांजली:मुख्यमंत्री

0
1115
पर्रिकर यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही
गोवा खबर:हिरवागार आणि स्वच्छ गोवा हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे स्वप्न होते.त्यांच्या संकल्पनेतील गोवा साकारताना त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही.पर्रिकर यांचे स्वप्न साकार करून गोवा हिरवागार आणि स्वच्छ राखणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पहिल्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहिली.
माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्व.मनोहर पर्रिकर यांची पहिली पुण्यतिथी सरकारी पातळीवर पाळण्यात आली.मीरामार येथील पर्रिकर यांच्या स्मृतीस्थळी यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री जेनिफर मोन्सेरात,दीपक पाऊसकर,फिलिप नेरी रॉड्रिग्स,आमदार बाबूश मोन्सेरात,विजय सरदेसाई,पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर, मुख्य सचिव परिमल राय, पोलिस महानिरिक्षक जसपाल सिंग,वित्त सचिव दौलत हवालदार, पणजी महापौर उदय मडकईकर,भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस दामू नाईक, संघटन मंत्री सतीश धोंड, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आदी उपस्थित होते.
पर्रिकर यांना पुष्पांजली वाहील्या नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पर्रिकर यांच्या निधना नंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना पर्रिकर यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही.त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतून घालून दिलेल्या मार्गावरुन वाटचाल सुरु असून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हे उद्दिष्ट नजरे समोर ठेवून माझ काम सुरु आहे.
पर्रिकर यांनी राज्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,राज्याला स्वच्छ आणि नितळ बनवण्यासाठी साळगाव येथे साकारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प सर्वोत्तम असाच आहे.राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हटले जाते.
मुख्यमंत्री म्हणाले,पर्रिकर यांनी आपल्या कारकीर्दीत सुरु केलेली कामे 2022 मध्ये पूर्ण होणार असून ती गोव्यासाठी पुढील पंचवीस वर्षे उपयोगी पडणार आहेत.पर्रिकर यांच्या रूपाने दूरदृष्टी लाभलेल्या नेत्याला आम्ही मुकलो असलो तरी त्यांची स्वप्ने पूर्ण करून त्यांच्या संकल्पनेतील गोवा साकारणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
मीरामार येथील कार्यक्रम पार पडल्या नंतर भाजप मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.