‘हिरकणी’ एक प्रेरणादायी दस्तऐवज :गोविंद गावडे

0
562
गोवा खबर:प्रतिकूल परिस्थितीत देखील अडथळ्यांवर मात करत अशक्य ते शक्य करून दाखविणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिला गोव्यात आहेत. अशा यशस्विनींच्या कार्याचा परिचय करून देणारे लेखिका भारती बांदोडकर यांचे ‘हिरकणी’ हे पुस्तक  म्हणजे एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
पर्वरी येथील सांस्कृतिक मंत्रालयात पीसफूल सोसायटीतर्फे लेखिका भारती बांदोडकर यांच्या ‘हिरकणी’ या पुस्तकाचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी मंत्री गावडे बोलत होते. यावेळी भारती बांदोडकर, मीरामार यूथ होस्टेलचे व्यवस्थापक अनंत जोशी, पीसफूल सोसायटीचे कार्यकारी सचिव प्रभाकर ढगे, श्रध्दा भारतीय आदी उपस्थित होते.
गावडे  म्हणाले, महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सक्षम असतात हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. अशा स्वयंसिध्द महिलांच्या कामगिरीचा आलेख चितारून लेखिका भारती बांदोडकर यांनी त्यांचा गौरवच केला आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना भारती बांदोडकर म्हणाल्या, गोमंतकीय महिला कर्तबगारीत कुठेही कमी नाहीत. अनेक अडचणीवर मात करून यशाचे शिखर सर करणाऱ्या या हिरकणींवरील लेखमालिकांना गोव्यातील मान्यवर वृत्तपत्रांनी नेहमीच प्रसिद्धी देऊन इतरांना स्फूर्ती देण्याचे काम केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रभाकर ढगे यांनी तर आभार प्रदर्शन अनंत जोशी यांनी केले