हिम्मत असल्यास कोळसा हाताळणीत वाढ करण्यात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत जबाबदार असल्याचा पुरावा द्या, कॉंग्रेसचे मुख्यमंत्र्यानाआव्हान 

0
588

 

गोवा खबर: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशातील प्रत्येक घटनात्मक व स्वतंत्र संस्थाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोळसा हाताळणीत वाढ करण्यासाठी मुरगाव पोर्ट ट्रस्टला दिलेल्या  परवानगीसाठी माजी  मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना जबाबदार धरण्याचे केलेले वक्तव्य म्हणजे भाजपच्या राजकारणाचे प्रतिबींब आहे. मुख्यमंत्र्यानी कोळसा हाताळणीत वाढ करण्यास दिगंबर कामत जबाबदार असल्याचा पुरावा सादर करण्याची हिम्मत दाखवावी, असे उघड आव्हान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रा येथे काल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे.
गोव्याचे डिफेक्टीव्ह, भ्रष्ट व असंवेदनशील मुख्यमंत्री सावंत यांना आपल्या सरकारचे अपयश व नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याची सवय झाली आहे. सरकारी कारभार व प्रशासन कसे चालते याबद्दल त्यांना एकतर माहित नाही किंवा भाजपच्या सर्व घटनात्मक व स्वतंत्र संस्थाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करुन घेण्याचे धोरण मुख्यमंत्री पुढे नेत आहेत अशी टिका  चोडणकर यांनी केली आहे. गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळ गोवा सरकारच्या नियंत्रणाखाली येत नसल्याचे मुख्यमंत्र्याना माहित नाही हे ऐकुन त्यांची कीव करावीशी वाटते असा टोमणा चोडणकर यांनी हाणला आहे.
मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणात जे सांगितले, तोच निकष लावला तर गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या २८ फेब्रुवारी २०२० रोजी  झालेल्या बैठकीत कामकाज क्रमांक १४२ खाली मेसर्स साउथ वेस्ट पोर्ट प्रा. लिमीटेड व मेसर्स अदानी मोर्मगाव गोवा पोर्च प्रा. लिमीटेड यांना कोळसा हाताळणीत वाढ करण्यासाठी भाजप सरकारच्याच आशिर्वादाने परवानगी देण्यात आली व भाजप गोव्यात कोळसा माफियाला प्रोत्साहन देते हे उघड होत असल्याचा दावा  चोडणकर यांनी केला आहे.
बेजबाबदार वक्तव्ये करुन आपलेच हसे करुन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यानी इतरांवर आरोप करताना आधी गृहपाठ करावा असा टोला  चोडणकर यांनी हाणला आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या २१ एप्रिल २०२० रोजी झालेल्या बैठकीत गोव्यात बर्थ क्रमांक ६ वर ५.५ मेट्रीक टन व बर्थ क्रमांक ७ वर ५.२ मेट्रीक टन कोळसा हाताळणी करण्यात वाढ करुन देण्यात गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडुन मान्यता मिळवीण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल केंद्रिय शिपींग मंत्रालयाचे  आभार मानण्यात आले आहेत हे  चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणुन दिले आहे.
कॉंग्रेस पक्षाने संदर्भ क्रमांक व तारीख यांच्या आधारे गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळ व मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांच्या बैठकींतील तपशील उघड केला आहे. यासबंधीचे सर्व पुरावे आम्ही योग्यवेळी उघड करु. मुख्यमंत्र्यांनी आमचे आव्हान स्विकारुन कॉंग्रेस सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोळसा हाताळणीत वाढ करण्यास परवानगी दिल्याचा केलेल्या दाव्याचा पुरावा देण्याची हिम्मत दाखवावी असे उघड आव्हान  चोडणकर यांनी दिले आहे.
कॉंग्रेस पक्षाने नेहमीच लोक भावनांचा आदर केला असुन, प्रसंगी स्वताच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचे वा रद्द करण्याचे निर्णय घेतले आहेत. गोव्याची अस्मिता व पर्यावरणाचे रक्षण करण्यास आम्ही वचनबद्द आहोत,असे चोडणकर म्हणाले.
आज गोव्यात भाजपला लोकांकडुन उघड विरोध वाढत चालला असुन, वैफल्यग्रस्त बनलेले मुख्यमंत्री आता बेताल वक्तव्ये करीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या क्रोनी क्लबसाठी गोव्याचे कोळसा हब मध्ये रुपांतरण करण्यास आम्ही प्राणपणाने विरोध करु असे  चोडणकर यांनी म्हटले आहे.