हिमालयीन चंद्र दुर्बिणीला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त…..

0
297

गोवा खबर:लडाखच्या शीत आणि शुष्क वाळवंटात समुद्रसपाटीपासून 4500 मीटर उंचीवर, दोन दशकांपासून 2 मीटर व्यासाची दृश्यप्रकाश-अतिरिक्त (optical-infrared) प्रकारची IAO म्हणजेच भारतीय खगोलीय वेधशाळा येथील हिमालयीन चंद्र दुर्बीण रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करत आहे. ताऱ्यांवरील स्फोट, धूमकेतू, उल्का, आणि बाह्य-ग्रहांचे निरीक्षण या दुर्बिणीद्वारे केले जात आहे.

 

 

बंगळुरु जवळील होसाकोटे येथील भारतीय ख-भौतिक संस्थेतील विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन केंद्राशी उपग्रह संदेशवहनाद्वारे जोडलेली ही दुर्बीण दूरस्थ पद्धतीने काम करते. या दुर्बिणीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे 260 संशोधनपत्रे प्रकाशित झाली आहेत.

या दुर्बिणीला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विज्ञान तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या IIA या स्वायत्त संस्थेकरवी 29-30 सप्टेंबर 2020 ला ऑनलाइन विज्ञान कार्यशाळा घेण्यात येत आहे. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून, विभागाचे माजी सचिव डॉ.व्ही.राममूर्ती या कार्यशाळेला संबोधित करणार आहेत. राममूर्ती यांच्याच कार्यकाळात IAO आणि या दुर्बिणीला मजुरी मिळून ते प्रकल्प पूर्ण झाले होते. या दुर्बिणीने विज्ञानजगताला दिलेल्या योगदानाविषयी आणि या दुर्बिणीच्या भवितव्याविषयी या दोन-दिवसीय कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.

याआधीच्या आणखी जुन्या आणि प्रस्थापित अशा दोन मीटर व्यासाच्या वर्गातील आंतरराष्ट्रीय दुर्बिणींच्या तोडीस तोड अशी ही दुर्बीण असून तिच्यात तीन वैज्ञानिक उपकरणे बसविली आहेत. या हिमालयीन चंद्र दुर्बिणीने पुरविलेल्या माहितीच्या आधारे 40 विद्यार्थ्यांच्या पीएचडीच्या प्रबंधात मोलाची भर घातली आहे. सध्या पीएचडी करणारे 36 विद्यार्थी या दुर्बिणीतून मिळणारी माहिती आपल्या अभ्यासासाठी वापरत आहेत.