हाथरस येथे घडलेल्या गुन्ह्यात सामील गुन्हेगारांचे भाजप संरक्षण करीत आहे : आप 

0
237
गोवा खबर:उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये घडलेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल आम आदमी पार्टीने अन्य सामाजिक संघटनांसह पणजी येथील आझाद मैदानावर मेणबतत्या पेटवून निषेध नोंदवला आहे.
 सरकार  दोषींचा  बचाव करत आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मध्यरात्रीच पीडितेचा मृतदेह जाळण्यात आला.  हिंदू परंपरेनुसार मध्यरात्री नंतर अंत्यसंस्कार करण्यात येत नाहीत. अंतिम संस्कार करण्यापासून तिच्या पालकांना  आणि कुटुंबातील सदस्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यापासून देखील वंचित ठेवण्यात आले आहे आणि त्यांचे फोन देखील हिसकावून घेतले आहेत. हे पाहता आपण खरंच  लोकशाहीत  राहत आहोत का,असा प्रश्न पडतो अशा शब्दात आप नेते राहुल म्हांबरे यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
म्हांबरे म्हणाले, उत्तर प्रदेश मधील भाजप सरकारला बलात्काऱ्यांना संरक्षण देण्याची सवयच आहे. त्यांनी या पूर्वीही चिन्मयनाद आणि सेंगर यांचे अशाच प्रकारे संरक्षण केले आहे. आज संपूर्ण देश रस्त्यावर  आला आहे आणि ह्या घटनेचा निषेध करत आहे. हे बघून निर्भया घटनेच्या भीषण आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि मागील आठ वर्षात काहीही बदललेले नाही याची जाणीव होते.
भाजपाचे बेटी बचाओ घोषणा एक फक्त एक घोषणा होती. देशात क्रूर बलात्कारांची मालिका दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आतापर्यंत सरकारकडून योग्य दृष्टीने कोणतीच कारवाई केली जात नाहीये. शिरदोण समुद्रकाठी एका अर्भक मुलीचा मृतदेह सापडून आठ दिवस झाले तरीही अद्याप पोलिसांना याचा काहीही उलगडा झालेला नाही.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आठ दिवस उलटून गेल्यावर जाग आली आहे आणि त्यांनी या प्रकरणाचा तपशील मागविला आहे. महिलांना सुरक्षितता देण्याचा भाजपचा कोणताही हेतू नाही,अशी टिका आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी केली.
मेणबत्ती यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल सर्वांनी  चिंता व्यक्त केली.
दिल्लीत आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप-कार्यकर्त्यांसह शुक्रवारी जंतर-मंतर येथे जमुन स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीसाठीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे  धैर्याने रिपोर्टिंग करून त्यांचा पर्दाफाश केल्याबद्दल त्यांनी माध्यमांचे कौतुक केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.