हळदोणे आमदार टिकलो पुत्राच्या भरधाव कारने बेळगावात तरुणीला चिरडले

0
1080
गोवा खबर:पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आझादनगरजवळ  हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो यांच्या मुलाच्या भरधाव कारने ठोकरल्याने एक पादचारी तरुणी जागीच ठार झाली तर दूसरी जखमी झाली आहे.  अपघातानंतर संतप्त जमावाने कारवर दगडफेक करुन ती पेटवून दिली.
तैनीयत वाहिद बिस्ती (वय 18) असे अपघातात जागीच ठार झालेल्या  तरुणीचे नाव आहे. तैनीयत ही मुळची बिस्ती गल्ली, कॅम्प येथील राहणारी होती. सध्या आझादनगर तिसऱ्या कॉसजवळ तिचे वास्तव्य होते. या अपघातात सम्रीन खालीद बिस्ती (वय 20, रा. कॅम्प) ही तरुणी जखमी झाली असून तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी 5 वाजता आझादनगर जवळील फळ बाजरा जवळ  हा अपघात झाला. जीए 03 झेड 0678 क्रमांकाच्या कारने ठोकरल्याने हा अपघात घडला आहे. ही बीएमडब्ल्यु कार बेंगळूरहून बेळगावमार्गे गोव्याला जात होती. फळ बाजारा जवळ पादचारी तरुणींना कारची धडक बसून तैनीयत जागीच ठार झाली. या अपघातानंतर जमाव संतप्त झाला.
 सायंकाळी या संबंधी काईल ग्लेनसोजा टिकलो (वय 27, रा. कळंगुट, बार्देश, गोवा) याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर बीएमडब्ल्यु कारवर दगडफेक करुन कार पेटविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु होती. मात्र रात्री उशीरापर्यंत या संबंधी फिर्याद दाखल झाली नव्हती. वाहतूक उत्तर विभाग पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.