हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला;मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

0
518

 गोवा खबर: जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत गोव्यात सुमारे १४ पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेत संपावर तोडगा काढावा अन्यथा गोवा हे बुडून मरण्याचे ठिकाण बनेल, अशी टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.हरमल किनाऱ्यावर आज एका रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामत यांनी ही टिका ट्वीट करून केली आहे.

गोव्यात जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत सुमारे १४ पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला असुन, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांच्या संपावर तोडगा काढावा,अशी मागणी कामत यांनी केली आहे.

हरमल किनाऱ्यावर आज सायंकाळी 64 वर्षीय रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.सकाळच्या सत्रात जीवरक्षकांनी कर्नाटक मधील दोघा पर्यटकांना हरमल किनाऱ्यावरुन बुडताना वाचवण्यात यश मिळवले आहे.जीवरक्षकांचा संप सुरु झाल्यापासून 14 पर्यटक बुडून मृत्यू झाला आहे.

सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलता दाखवणे महत्वाचे आहे. जीवरक्षकाना सरकारी सेवेत सामावुन घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे,असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने त्वरीत यात हस्तक्षेप न केल्यास संपुर्ण पर्यटन व्यवसायच बुडण्याची भीती व्यक्त करून कामत म्हणाले, अशा घटना वाढू लागल्यास गोवा हे जलसमाधी स्थळ बदनाम होईल हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे.

आपला जीव धोक्यात घालुन, दुसऱ्यांचे जीव वाचवण्याची सेवा बजावणाऱ्या गोमंतकीय जीवरक्षकांना सर्व मदत व सहकार्य देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे,असेही कामत म्हणाले.

गोव्यातील पर्यटन व्यवसाय सध्या कठिण परिस्थीतीतुन जात आहे. रद्द झालेली चार्टर विमाने, शॅक वाटपात झालेला विलंब तसेच देशात आलेले आर्थिक मंदीचे सावट यामुळे पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. सरकारला पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी त्वरीत उपाय काढणे गरजेचे आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्र्यानी त्वरित संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व गोमंतकीय जीवरक्षकाना सरकारी सेवेत घेण्यासाठी पाऊले उचलावीत,अशी मागणी कामत यांनी केली आहे.