हडफडे येथे मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरपी शिबिराचे उद्घाटन

0
856

 गोवा खबर:बार्देश तालुक्यातील हडफडे येथे आज तीन दिवसीय मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरपी शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री  श्रीपाद नाईक यांनी केले.

श्री चौरंगीनाथ भूमिका पंचायतन देवस्थान मंदिराच्या सभामंडपात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गोव्यामध्ये आयोजित केलेले हे पाचवे शिबीर आहे. आयुष मंत्रालय अंतर्गत काम करणारी केंद्रीय योग व निसर्गोपचार संशोधन परिषद, मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा तसेच राज्याच्या आयुष विभागाचे आरोग्य सेवा संचलनालय व आयुर्वेदिक न्युरोथेरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कोटा, राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात येत आहे.

उद्घाटन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, की निस्वार्थी भावनेने केवळ समाजकार्य म्हणून रुग्णसेवा करणाऱ्या उपस्थित सर्व डॉक्टरांचे मला कौतुक वाटते. या कामामुळे अनेक रुग्णांना वेदनेपासून आराम मिळाला आहे. पुशे बोलताना नाईक म्हणाले की, स्वास्थ्य सर्वकाही आहे, आरोग्य नसल्यास संपत्तीचा काही उपयोग नाही याची जाणीव असल्यामुळे अशा सिबिरांचे आयोजन करीत आहे. ज्या पद्धतीने नागरिक या उपचारांना प्रतिसाद देत आहेत त्यामुळे हे काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. आयुर्वेद उपचार उशिरा परिणाम दाखवतात हा गैरसमज असल्याचे नाईक यावेळी म्हणाले; शिवाय कायमस्वरूपी आजार निवारणासाठी आयुर्वेद उपचार उत्तम आहेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या शिबिरासाठी आयुर्वेदिक न्युरोथेरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कोटा, राजस्थानचे डॉ. मनोज शर्मा आपल्या चमुसह उपस्थित झाले आहेत.