स्व.किशोरीताई आमोणकर संगीत संमेलनात रंगणार दिग्गजांच्या मैफली

0
1106

गोवाखबर: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज गोमंतकीय सुकन्या पद्मविभूषण गानसरस्वती स्व. किशोरीताई आमोणकर यांच्या निधनास यावर्षी एप्रिलमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर व किशोरीताईंसारख्या श्रेष्ठ व्यक्तीमत्वाचे स्मरण म्हणून त्यांना समर्पित ‘गानसरस्वती किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आज सायंकाळी सुरुवात होणार असून उद्या दिवसभर कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात दिग्गज कलाकारांच्या मैफली रंगणार आहेत.
महोत्सवाचे आज सायं. 5 वाजता होणार आहे.

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी किशोरीताई यांचे सुपूत्र सर्वश्री निहार व बिभास आमोणकर आणि स्नुषा विवियन व भारती आमोणकर यांची खास उपस्थिती असणार आहे. स्व. किशोरीताईंची सुमारे 30 वर्षे सावलीसारखी साथ व सेवा करणाऱया श्रीमती मीना वायकर यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

महोत्सवात किशोरीताईंचा शिष्यवर्ग, नामवंत गायक, वादक कलाकार व गोमंतकीय कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाच्या पूर्वारंभी कार्यक्रमात स्व. किशोरीताईंचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या ‘मितश्रुत किशोरी आमोणकर’ हा गानसरस्वतींच्या 1960 ते 1985 या 25 वर्षांच्या कालखंडातील संगीतावर आधारित रसग्रहणात्मक कार्यक्रमाला अकादमीच्या कृष्णकक्षात सुरुवात झाली आहे. अनवट बंदिशी सप्रात्यक्षिक डॉ. अरुण द्रविड सादर करत आहेत. किशोरीताईंच्या आता उपलब्ध नसलेल्या अनेक दुर्मिळ मैफलीतील गायनाच्या ध्वनीफीती संपादीत व संक्षिप्त स्वरुपात ऐकण्याची संधी श्रोते घेत आहेत.

आज सायंकाळी 4.30 वा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात मुंबई दूरदर्शन निर्मित स्व. किशोरीताईंवरील माहितीपट दाखविण्यात येणार आहे.

किशोरीताईंचे सुपूत्र बिभास आमोणकर यांनी संपादित केलेल्या ताईंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही अकादमीच्या दर्शनी भागात भरविण्यात आले आहे. उद्घाटन समारंभानंतर होणाऱ्या सत्रात सायंकाळी. 5.30 वाजता किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर यांचे गायन होईल व नंतर पं. जतीश व्यास यांचे संतूरवादन झाल्यानंतर पहिल्या सत्राची सांगता विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांच्या गायन मैफ्ढलीने होणार आहे.

रविवार सकाळी 10.30 वा. ताईंच्या ज्येष्ठ शिष्या नंदिनी बेडेकर यांचे गायन होईल. सत्राची सांगता आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने होणार आहे.

सायंकाळी. 4.30 वाजता कला अकादमीच्या हिंदुस्थानी संगीत विभागातील कलाकार रुपेश गांवस, सचिन तेली, प्रचला आमोणकर व सम्राज्ञी आईर शास्त्रीय गायन सादर करतील. सायं. 4.45 वा. मांजिरी असनारे केळकर यांचे गायन व संगीत महोत्सवाची सांगता पं. उल्हास कशाळकर यांच्या मैफलीने होणार आहे. या सर्व नामवंत कलाकारांना पं. विश्वनाथ कान्हेरे, डॉ. रवींद्र काटोटी, सुयोग कुंडलकर, दत्तराज सुर्लकर, मंगेश मुळ्ये, भरत कामत, श्रीधर मांडरे, ओजस अधिया, अमर मोपकर व सोनिक वेलींगकर या वादक कलाकारांची साथसंगत लाभणार आहे.