‘स्वस्थ भारत’ निर्माण करण्याचे काम आयुष मंत्रालय करणार- श्रीपाद नाईक

0
1362

तीन दिवसीय निसर्गोपचार शिबिराचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

गोवा खबर:केंद्रीय आयुष मंत्रालय पंतप्रधानांनी सुरु केलेल्या ‘स्वस्थ भारत’ मोहिमेचे काम पूर्ण करेल, असा आशावाद केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या तीन दिवसीय शिबिराचा आज समारोप झाला, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधानांनी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून योग आणि आयुष उपचार पद्धती जगभर पोहचवली असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, सह सचिव पी.के.रणजीत कुमार, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक अर्मेलिंदा डायस, गोवा शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक कमोदोर बी. बी. नागपाल यांची उपस्थिती होती.

महात्मा गांधींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरातून जनतेने निसर्गोपचाराकडे वळावे, असे श्रीपाद नाईक म्हणाले. पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचा विस्तार होत असून त्यांना भविष्यात अभिमत विद्यापीठाचा दर्जाही देण्यात येईल, असे श्रीपाद नाईक यांनी जाहीर केले. गांधीजींनी निसर्गोपचाराला प्राधान्य दिले होते. ध्यान, उपवास यामुळे शरीर संतुलन कायम राहते, यावर गांधीजींचा भर होता. सध्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आजारानंतर उपचार सुरु केले जातात. मात्र, निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब केल्यास व्याधीमुक्त शरीर होते, असे श्रीपाद नाईक पुढे बोलताना म्हणाले.

राज्यात आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे महाविद्यालय तसेच उपचारकेंद्र सुरु आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पुढाकार घेऊन निसर्गोपचार केंद्र उपलब्ध करुन दिल्यास राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आयुष उपचारपद्धतीचे पुनरुज्जीवन झाल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या ‘महात्मा गांधी और प्राकृतिक चिकित्सा’ आणि ‘निसर्गोपचार वार्ता’ या पुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच निसर्गोपचार क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला.

तीन दिवसीय शिबिरात 10 निसर्गोपचार महाविद्यालये, 300 निसर्गोपचार संस्थांनी सहभाग नोंदवला होता. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर दीडशे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातील पहिले शिबिर आयोजन करण्याचा मान गोव्याला मिळाला.