स्वत:ला वाळूत गाडून घेत युवक काँग्रेसने केला सरकारचा निषेध

0
1265
गोवा खबर: नव्या सीआरझेड अधिसूचनेला विरोध करत काँग्रेसने मिरामार येथील किना-यावरील वाळून युवा कार्यकर्त्यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत गाडून घेत सरकारचा निषेध नोंदवला. काही बिगर शासकीय संघटनांचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते. 
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी याप्रसंगी बोलताना आगामी विधानसभा अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा सरकार पुरस्कृत विध्वंस असल्याची टीका केली. ते म्हणाले  ‘नव्या अधिसूचनेमुळे गोव्याचे किनारे नष्ट होतील. पारंपरिक मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होईल. जोपर्यंत अधिसूचना मागे घेतली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
गोंयच्या रांपणकारांचा एकवोटचे सचिव ओलांसियो सिमोइश यांनी ‘ खाण व्यवसायाप्रमाणे पर्यटनही गोव्यातून हद्दपार होईल. सागरमाला अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांमधून गोव्याचे किनारे नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली.
आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत गाडून घेतले होते. त्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. अधिसूचना रद्द होईपर्यंत हे आंदोलन पुढे चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष विजय भिके, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, शंकर किर्लपालकर, गुरुदास नाटेकर, पणजी गटाध्यक्षा मुक्ता फोंडवेंकर, विश्वनाथ हळर्णकर, अमरनाथ पणजीकर व इतर यावेळी उपस्थित होते. सरकाराच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच गिटारवर निषेधाची गाणीही म्हटली.