
गोवा खबर : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वितेसाठी जनते मधला वर्तनात्मक बदल आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाच्या महत्वावर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालय राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी भर दिला आहे. फिक्कीने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या भारत स्वच्छता परिषद 2018 मधे ते आज बोलत होते. स्वच्छतागृहे बांधुन त्याचा वापर करण्यासंदर्भात जनतेत वर्तनात्मक बदल घडवण्यासाठी खाजगी क्षेत्राने समाजातल्या तळापर्यंत महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. 2014 मध्ये लाल किल्ल्यावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी केलेल्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियानाला अभूतपूर्व गती आली असे सांगून या अभियानाने व्यापक चळवळीचे स्वरुप घेतले असून, आता हे अभियान जनआंदोलन बनत चालल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
नागरी स्वच्छता क्षेत्रात एप्रिल 2018 पर्यंत 2050 शहरे हागणदारीमुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छतेबाबत शहरांमधे निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण पाहणी घेतली. 2016 मधे यात 73 शहरांचे तर 4 जानेवारी ते10 मार्च 2018 याकाळात 4023 शहरांचे सर्वेक्षण झाले.