स्मार्ट सिटीच्या नावाने उधळलेल्या पैशांचा हिशोब द्या:चोडणकर

0
1307

गोवा खबर:पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाने स्मार्ट करप्शन सुरु आहे.या प्रकल्पा अंतर्गत आतापर्यंत किती पैसे खर्च झाले आणि त्याचा पणजी स्मार्ट होण्यासाठी किती उपयोग झाला याची माहिती देणारी श्वेतपत्रिका येत्या तीन दिवसात जाहीर करावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

चोडणकर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक असलेल्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यावर जोरदार तोफ डागत कुंकळ्येकर हे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पणजी स्मार्ट सिटी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.अशा अपयशी माणसाला भाजपने उमेदवारी दिली आहे.त्यामुळे यापुढे देखील कुंकळ्येकर यांचा भ्रष्ट कारभार उघड करतच राहू असा इशारा देखील चोडणकर यांनी दिला आहे.

चोडणकर म्हणाले,स्मार्ट सिटीच्या ऑफिसच्या नुतनीकरणासाठी 20 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.जे काम जीएसआयडीसीने करायला हवे होते त्यावर स्मार्ट सिटी 20 कोटी रुपये उधळणार आहे.

शहरात पाणी पुरवठा सुरळीत नसताना केवळ ऑफिस स्मार्ट करून शहर स्मार्ट कसे होणार असा प्रश्न चोडणकर यांनी यावेळी उपस्थित केला.

स्मार्ट सिटीच्या नावाने उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप करताना चोडणकर यांनी कॉर्तिन मध्ये पदपुलच्या टाइल्स बदलण्यावर झालेला सव्वा कोटींचा खर्च,झेब्रा क्रॉसिंग साठी होणाऱ्या 35 लाख रूपयांचा खर्चाचा हवाला दिला.

पणजीच्या 35 हजार लोकांनी निवडून दिलेल्या मनपाचे बजेट फक्त 65 कोटी रुपये असल्याचे सांगून चोडणकर म्हणाले,जो निवडून आलेला देखील नाही अशा सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना 6 हजार 200 कोटींचे बजेट हे समजण्या पलिकडील आहे.कुंकळ्येकर यांना विचारणारा कोणी नसल्यानेच त्यांच्या कडून स्मार्ट करप्शन सुरु आहे.स्मार्ट सिटी प्रकल्प राबवल्या पासून पणजीचा दर्जा सतत खालावत असून त्याला कुंकळ्येकर हेच जबाबदार आहेत.असल्या अपयशी माणसाचा भ्रष्ट कारभार सतत उघड करून लोकांसमोर त्यांचे खरे रूप आणणार आहोत.

चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टिकेची झोड उठवत त्यांनी पणजीत रोजगाराच्या प्रश्नाला प्राधान्य नसल्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध केला.चोडणकर म्हणाले,पणजीत रोजगाराची समस्या गंभीर आहे.युवक नोकऱ्या नसल्याने निराश झाले आहेत.मुख्यमंत्री सावंत यांनी पणजीत रोजगाराच्या प्रश्नाला प्राधान्य नसल्याचे सांगून युवकांची थट्टा केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या अपरिपक्व विधानाचा आम्ही निषेध करत असून त्यांनी जनतेची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.