स्पीड गव्हर्नरवर मुख्यमंत्री ठाम,संप तिसऱ्या दिवशीही सुरुच

0
828
गोवा खबर:सरकार आणि टॅक्सी चालक संघटना आपापल्या मतांवर ठाम राहिल्याने कालदेखील टॅक्सी चालकांच्या संपावर तोडगा निघू शकला नाही.आज तिसऱ्या दिवशीही टॅक्सी चालकांचा संप सुरु राहणार असून पर्यटकांना त्याचा चांगलाच फटका बसणार आहे.स्पीड गव्हर्नर बसवणे कायद्याने अनिवार्य असून त्याची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट मिळणार नाहीत,असे काल मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
स्पीड गव्हर्नर देशात सगळीकडे बसवाला जात असून गोव्यात देखील त्याची कायद्यानुसार अंमलबजावणी करावी लागेल.सरकारने स्पीड गव्हर्नर बसवण्यासाठी दिलेली मुदत 24 फेब्रूवारी रोजी संपणार आहे.त्यानंतर स्पीड गव्हर्नर न बसवलेल्या वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट मिळणार नाही असे आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणाले,केंद्राचा कायदा सगळ्यांसाठी बंधनकारक आहे.जर कोणाकडे त्याचे कायदेशीर सॉल्यूशन असेल तर त्यांनी ते माझ्या नजरेस आणून द्यावे .
काँग्रेस शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
टॅक्सी चालकांच्या संपाला काँग्रेस नेत्यांकडून समर्थन मिळत आहे.काल महिला प्रदेश समितिने संपकऱ्यांना पाठिंबा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यश शांताराम नाईक हे आज  दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी करणार आहेत.काँग्रेसच्या नेत्यांची भेटीची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.
सरकारी खात्यातील त्या टॅक्सींचे करार रद्द होणार
सरकारने अनेक खात्यांमध्ये खाजगी टॅक्सी भाड्याने घेतल्या आहेत.करारा नुसार या टॅक्सीनी आपली सेवा देणे अनिवार्य असल्याने ज्यानी अशा प्रकारची सेवा न देऊन कराराचा भंग केला आहे त्यांचे करार रद्द केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल सांगितले.टॅक्सी चालकांचा संप सुरु झाल्यानंतर काही टॅक्सी चालकांनी आपल्या टॅक्सी सरकारी कार्यालयात आणल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे.त्यांचे करार रद्द करून त्यांची सेवा थांबवली जाणार आहे.
बस चालक संघटना आज निर्णय घेणार
बस चालक संघटना टॅक्सी चालकांच्या संपाला पाठिंबा देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.आज बस चालक संघटनांची बैठक होणार असून त्यात संपाला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.शालेय विद्यर्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने बस चालक संघटना संपात उतरण्याची शक्यता फारच कमी वाटत आहे.
पर्यायी व्यवस्थेची सोमवारी घोषणा
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कायद्याला आव्हान देत बेकयदेशीर सुरु असलेल्या टॅक्सी चालकांच्या संपाची गंभीर दखल घेतली आहे.टॅक्सी चालकांनी रितसर नोटिस दिलेली नाही आणि मागण्याचे निवेदन देखील कोणी आपल्याकडे दिले नसल्याचे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सोमवारी ओला, उबर किंवा त्याधर्तीवरील टॅक्सी सेवा सुरु करण्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1615973998495432&id=872431582849681