स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी शिक्षण संचालनालयाची एम्बाईबसोबत भागीदारी

0
272
गोवा खबर:यंदाच्या वर्षी गोवा सीईटी, जेईई व एनईईटी (नीट) या पुढे ढकललेल्या व आता जुलैच्या तिसर्‍या महिन्यात घेण्यात येणार्‍या परीक्षांच्या तयारीसाठी थेट लेक्चर्सना हजर न राहता विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्ग शोधून काढला आहे. देशात कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना  या परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. 
शिक्षण संचालनालयाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) आधारावर कार्यरत असणार्‍या शिकणे, सराव करणे व चाचण्या यासाठी एक ऑनलाईन व्यासपीठ म्हणून कार्यरत असलेल्या एम्बाईब (Embibe) सोबत भागीदारी केली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यभरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम्बाईबच्या पर्सनलाईज्ड ऍडेप्टिव लर्निंग प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या एका चाचणीद्वारे या भागीदारीला सुरूवात झाली. या चाचणीद्वारे, सरकारी तसेच सरकारी अनुदानित विद्यालयांमधील सुमारे २२,००० विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी विशिष्ट क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा, त्या विकसित करणे आणि शिक्षकांनी या मुद्यांवर भर देऊन विद्यार्थ्यांचे बोर्डाच्या परीक्षेतील गुण सुधारण्यात मदत करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या संकटाच्या काळात ज्यावेळी विद्यार्थ्यांना मदतीची अधिक गरज आहे, त्यावेळी या भागीदारीचा लाभ आता अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी उत्सुक असलेल्या राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे, ज्यांना सध्याच्या लॉकडाऊनमुळे वर्गांना उपस्थित राहता येत नाही. भावी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी एम्बाईबचा वापर करणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या सुरक्षित वातावरणातून अधिक चांगल्या प्रकारे शिकता यावे  यासाठी, शिक्षण संचालनालयातर्फे एम्बाईबच्या सहकार्याने, विश्लेषणात्मकदृष्ट्या मदत देण्यात येणार आहे.
राज्यातील सरकारी व सरकारी अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या सराव चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेचा अनुभव तर घेता येईलच, पण त्यासोबतच आपण कुठे कमी पडतोय ते ही पडताळून पाहण्याची संधी मिळेल व त्यावर मात करण्यासाठी वेगळी सत्रे आयोजित करण्यात येतील. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सराव चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ही सुविधा आता सरकारी अनुदानित विद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध करण्यात आली आहे. १२ मे पासून मॉक टेस्ट्स सुरू झाल्या आहेत.