स्थिर सरकारसाठी भाजपला विजयी करा: गडकरी

0
839
 गोवा खबर:माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वप्ने पूर्ण करून गोवा देशात आदर्श राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे.अस्थिरतेकडून गोव्याला स्थिरतेकडे नेण्यासाठी भाजपला विजयी करा,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज मांद्रे,डिचोली, म्हापसा आणि फोंडा येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले.
भाजपच्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी नितिन गडकरी यांनी चार जाहीर सभा घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली.सगळ्या सभांना झालेली गर्दी पाहता लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभेच्या तिन्ही पोटनिवडणुका भाजप विजयी होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे.
गडकरी यांनी आपल्या भाषणांमध्ये भाजप आघाडी मध्ये सहभागी असून देखील युतीचा धर्म पायदळी तुडवून भाजप समोर संकट निर्माण करत असलेल्या ढवळीकर बंधूंचा शेलक्या भाषेत समाचार घेतला.
गडकरी म्हणाले मगो पक्षाने लग्न आमच्या सोबत केले मात्र नांदायला घरात यायची त्यांची तयारी नाही.सध्या ढवळीकर बंधू भाजपवर जी टिका करत आहेत त्याला कोणताही वैचारिक आधार नाही.
बंधूप्रेम आणि नात्यागोत्यात अडकुन पडलेल्यांची राजकारणात माती होते,हा इतिहास आहे.त्यामुळे ढवळीकर यांच्याकडे दुर्लक्ष करा,असा सल्ला देखील गडकरी यांनी उपस्थित लोकांना दिला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसला गेल्या 60 वर्षात जमले नाही ते पाच वर्षात करून दाखवले असल्याचे सांगून गडकरी म्हणाले,माझ्या खात्यातर्फे गोव्याला 15 हजार कोटी रुपये दिले आहेत.त्यातून रस्ते,पुल यासारखी विकास कामे सुरु झाली आहेत.गोव्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगुन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सातत्याने काम केले होते.त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
यावेळी काँग्रेसचे उमेदवार प्रचारासाठी येत असता त्यांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात राज्याला किती आर्थिक मदत मिळाली, याचा हिशेब मागा, असे आवाहन गडकरींनी गोवेकरांना केले. अगदी जवाहरलाल नेहरू ते मनमोहनसिंग सरकारपर्यंत काँग्रेसने ‘गरिबी हटावो’चा नारा दिला, पण त्यांना गरिबी काही हटवता आली नाही. अल्पसंख्याकाच्या मनात भाजपबद्धल भीती तयार करून भाजपला सत्तेपासून रोखणे, हा एककलमी कार्यक्रम काँग्रेस राबवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपने केंद्र तथा राज्यात विविध सामाजिक योजना राबवल्या आणि या योजनांत कुठेच जाती, धर्म, भाषा, प्रांत असा मतभेद केला नाही, असेही त्यांनी सांगितले.
मांद्रे येथील सभेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,लोकसभेचे उमेदवार श्रीपाद नाईक, मांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार दयानंद सोपटे, प्रदेश उपाध्यक्ष कुंदा चोडणकर,माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांची देखील भाषणे झाली.व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघातील बहुतेक सर्व पंचायतींचे सरपंच आणि पंच सदस्य उपस्थित होते.