स्त्रीभ्रूण हत्येची चौकशी करा:आप

0
266

 

गोवा खबर:उत्तर गोव्यातील शिरदोण समुद्र किनाऱ्यावर एका स्त्री अर्भक  छिन्नविछीन्नावस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली असून या प्रकरणात आपने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

एक आठवडा उलटूनसुद्धा पोलिस चौकशीत काहीच समोर आले नाही. पोलिस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी,अशी मागणी आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे  केली आहे.
गोव्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. गुन्हेगारांना कशाचेच भय उरले नाही आणि म्हणूनच राजरोसपणे एखाद्या अर्भकाचा खून करून त्याला समुद्रकाठी पुरण्यासारखी गोष्ट घडत आहे,असा आरोप तिळवे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना गोव्याचे दुसऱ्या उत्तर प्रदेशमध्ये रूपांतर करायचे आहे का,असा प्रश्न करून तिळवे म्हणाले, महिलांवरील भयंकर गुन्ह्यांचे मालिकासत्र आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची निष्क्रियता सर्वांसमोर आलेलीच आहे.
या गंभीर प्रश्नावर गोवा पोलीस काहीच भाष्य करत नाहीत.पोलिसांना तपासासाठी एवढा वेळ का लागला, मागील आठ  दिवसांपासून ते काय करीत आहेत, समुद्रकिनार्‍यावर पोलिस गस्त ही नियमित गोष्ट आहे, तर ह्या प्रसंगी ते काय करीत होते,असे प्रश्न उपस्थित करत तिळवे यांनी  मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ नसल्या बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.