स्ट्रिमिंगमुळे स्थानिक चित्रपट निर्मितीचा खर्चही वाढेल-नील आर्देन ओप्‍लव

0
543

गोवा खबर:आजकाल लोकप्रिय होत असलेल्या स्ट्रिमिंग या वेबसर्व्हिसमुळे मोठ्या चित्रपट निर्मिती कंपन्यांची एकाधिकारशाही कमी होईल आणि याचा लाभ छोट्या चित्रपट निर्मात्यांना नक्कीच होईल, मात्र ते त्याचवेळी स्ट्रिमिंगमुळे स्थानिक चित्रपट निर्मितीचा खर्च वाढेल असे मत ‘डॅनिअल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नील आर्देन ओप्लव यांनी व्यक्त केले. गोव्यात सुरू असलेल्या 50 व्या इफ्फी दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

अमेरिकेत चित्रपट निर्मितीत मोठ्या चित्रपट निर्मिती स्टुडिओंचा वरचष्मा असतो. मात्र, युरोपमध्ये चित्रपट निर्मितीत स्वतंत्र कार्यशैलीवर भर दिला जातो. भारतातली चित्रपट निर्मिती देखील काहिशी अमेरिकेसारखीच आहे. युरोपापेक्षा ती लॉस एजेंलिसला लवकर मागे टाकेल. युरोपमध्ये मध्यम खर्चात सिनेमा बनवला जातो आणि काही वेळेला चित्रपट निर्माते सिनेमासाठी युरोपियन महासंघ किंवा विविध देशांमधल्या सरकारांकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असतात, असे ओप्लव म्हणाले.

आपल्या ‘दानियल’ चित्रपटाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, सिरीयामध्ये आयसिसने पकडलेल्या एका पत्रकार युवकाच्या खऱ्या कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे. त्यांचा हा चित्रपट मास्टर फ्रेम्स या विभागात इफ्फीमध्ये दाखविण्यात आला आहे.

इटालियन चित्रपट ‘रवांडा’चे दिग्दर्शक रिकार्डो सालवेत्ती हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांचा चित्रपट युनेस्कोच्या गांधी मेडल या स्पर्धा विभागात निवडण्यात आला आहे. या चित्रपटाविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की, आफ्रिकेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या खऱ्या घटनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत आणि दिग्दर्शनात अनेक अडचणींचा सामना करावा लागला तसेच निधीअभावी चित्रीकरणही इटलीतच करावे लागले. मात्र, आम्ही अशी चित्रकरण स्थळे निवडली जी आफ्रिकेतल्या अनेक स्थळांशी साम्य असलेली होती. अगदी रवांडाच्या लोकांनाही ही स्थळं इटलीतली असल्याचेही कळले नाही, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटात रंगभूमी आणि सिनेमा यांच्यातल्या समतोल राखण्याचा नवा प्रयोग केला असल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या भाषा आणि प्रकारांमध्ये हा चित्रपट बनवला आहे, असे ते म्हणाले.

‘स्कॅंडॅनिव्हियन सायलेन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एरिक पोल्‍लुमा यांनीही या पत्रकार परिषदेत आपले अनुभव सांगितले. मनावैज्ञानिक नाट्यावर आधारलेल्या या चित्रपटात दोन व्यक्तीरेखांचे पुनर्मिलन दाखविण्यात आले आहे. पोल्लुमा यांच्या मते उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी अचूक प्रतिमा आणि चित्रिकरणाचे नेमके कोन साधणे हे खरे कसब आहे.

‘डॅनियल’ चित्रपटाचा सारांश

अलिकडेच झालेल्या अपहरणाच्या घटनेवर ‘डॅनियल’ हा चित्रपट आधारलेला आहे. चित्रपटाचा नायक डॅनियल रे हा डॅनिश पत्रकार असतो. त्याचे आयसिसकडून अपहरण केले जाते आणि 398 दिवस तो त्यांच्या ताब्यात असतो. त्याच्यासोबत इतर अनेक परदेशी नागरिक आणि अमेरिकन पत्रकार जेम्स फोले याचेही अपहरण झालेले असते. या चित्रपटात अपहरण झाल्यानंतरचा त्याचा संघर्ष जेम्ससोबतची त्याची मैत्री आणि मृत्यू समोर दिसत असतानाची त्यांची भावनिक उलाथाल दाखविण्यात आली आहे.

‘रवांडा’चा सारांश

इतिहासातल्या सर्वात वेगाने आणि योजनाबद्ध रितीने झालेल्या सामूहिक हत्याकांडावर हा सिनेमा आधारलेला आहे.

‘स्कॅंडॅनिव्हियन सायलेन्स’ चा सारांश

या मनोवैज्ञानिक थरार पटात दोन व्यक्तीरेखांचे पुनर्मिलन दर्शवण्यात आले आहे. युरोपातल्या हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेल्या या प्रवासात त्यांना आपल्या भूतकाळातील हिंसक घटनांची आठवण होते. भूतकाळातल्या गुंतागुंतीचा मागोवा घेताना ते अशा वळणावर पोहोचतात जिथे त्यांचे भविष्य निश्चित होणार असते.