सोमवार, मंगळवारी मुसळधाराचा अंदाज

0
66

गोवा खबर : अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्यात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने व्यक्त केली आहे.

अंदमानमधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश किनारपट्टीवर 12 रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. गोव्यातही वार्‍याचा पॅटर्न बदलणार असून पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहील आणि जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस हवेतील आद्रताही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या चक्रिवादळ इशारा विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदमान समुद्र व शेजारील भागात 9 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेकडे 10 ऑक्टोबर रोजी सरकणार असून त्यामुळे बंगालच्या उपसागरात त्याची तीव्रता वाढलेली पाहायला मिळणार आहे.

चक्रिवादळाच्या प्रभावामुळे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील काही भागांना खराब हवामानाचा फटका बसणार आहे.