सोपटे, शिरोडकर स्वखुशीने भाजपात; पक्षाने एक पैसा खर्च केला नाही:तेंडुलकर

0
1548
गोवा खबर :  काँग्रेस पक्ष सोडून आलेल्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांना आमच्या पक्षाने एकही पैसा दिलेला नाही. त्यांच्यासाठी पक्षाने एक देखील पैसा खर्च केला नाही. त्यांच्या विमानाचे तिकीटही त्यांनीच काढले व त्यांच्यासाठी हॉटेलची खोली आरक्षित देखील त्यांनी स्वत:च केली होती. भाजपाने त्यात काहीच केलेले नाही. खाण मालकाने पैसा दिला, असा चुकीचा आरोप केला जात आहे.दोन आमदार भाजप मध्ये आल्याने काँग्रेस मुक्त भारत या आमच्या मोहिमेला बळकटी मिळाली आहे,असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाजप कोअर कमीटीच्या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपाचे काही माजी आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा आमदारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत  तेंडुलकर यांनी पक्षातील काही असंतुष्टांचा समाचार घेतला.
बैठकीनंतर पत्रकारांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या टीकेविषयी तेंडुलकर यांना विचारले. दयानंद सोपटे किंवा सुभाष शिरोडकर यांना पक्षात घेताना पार्सेकर वगैरेंना विचारले नाही अशी टीका होत आहे. तसेच गेल्या निवडणुकीच्या पराभवाचे खापर आपल्यावर अकारण फोडले गेले, असे पार्सेकर म्हणत असल्याविषयी काय वाटते. असे तेंडुलकर यांना विचारताच तेंडुलकर म्हणाले, आम्हाला भाजप बळकट करायचा आहे. सोपटे व शिरोडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही मांद्रे व शिरोडा हे दोन्ही मतदारसंघ निश्चितच जिंकणार आहोत. सोपटे यांना भाजपाचा यापूर्वीचा अनुभव आहे. ते कार्यकर्त्यांशी चांगले वागतील. शिरोडकर तर सहा वेळा शिरोड्यातून निवडून आले आहेत. भाजपाचे काही माजी आमदार कार्यकर्त्यांशी चांगल्या प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
तेंडुलकर म्हणाले, काँग्रेसमुक्त भारत ही भाजपची राष्ट्रीय स्तरावरील घोषणा आहे. त्याच पद्धतीने पक्ष पुढे जात आहे. काँग्रेसमधील जर कुणी आमच्या पक्षात येत असतील तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही. यापुढे देखील आणखी तिघे काँग्रेस आमदार पक्ष सोडू शकतात. ते तिघे आमदार भाजपामध्ये, गोवा फॉरवर्डमध्ये की मगो पक्षात जातील ते आम्ही सांगू शकत नाही.
दरम्यान मुख्यमंत्र्यांकडील अतिरिक्त खाती आघाडीतील घटक पक्षांना वाटून देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई आणि मगो नेते सुदिन ढवळीकर आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते.यापूर्वी सरदेसाई आणि ढवळीकर यांनी 12 तारीखला मुख्यमंत्री पर्रिकर यांची दिल्लीतील एम्स मध्ये भेट घेऊन खातेवाटपा बाबत चर्चा केली होती.उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप मध्ये आलेल्या सोपटे आणि शिरोडकर यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांची दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याची माहिती तेंडुलकर यांनी दिली.मुख्यमंत्री सध्या उपचार आणि विश्रांती घेत असून दिवाळी पर्यंत ते हळूहळू काम सुरु करतील,अशी अपेक्षा देखील तेंडुलकर यांनी व्यक्त केली.