सोपटे, शिरोडकरांसह भाजपला जनताच धडा शिकवेल:काँग्रेस

0
1292
गोवा खबर:भाजपने दोन आमदार फोडल्या नंतर हादरलेल्या काँग्रेसने आज भाजपवर जोरदार टिका करताना येऊ घेतलेल्या निवडणुकीत जनता भाजपला आणि काँग्रेस सोडून गेलेल्या आमदारांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही,असा विश्वास व्यक्त केला.
 सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने मागील दारातून प्रवेश करून सरकार स्थापन केले. आताही राज्यातील सरकारी यंत्रणा तसेच केंद्रातील यंत्रणेचा गैरवापर भाजपने केला आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी प्रचंड दबावाखालीच आमदारकी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली.
काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला काँग्रेसचे १४ आमदार हजर होते. येत्या पोटनिवडणुकीत या दोन्ही नेत्यांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.

येत्या ६ महिन्यांत हे सरकार कोसळणार आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असा विश्वास आमदार रवी नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. बाबू कवळेकर हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे  नाईक व आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
मतदारांनी दिलेला कौल भाजप उघडपणे झिडकारत आहे. राज्यपाल कार्यालयाचा भाजपकडून गैरवापर सुरू आहे, असा आरोप आमदार लुईझिन फालेरो यांनी केला. सोपटे व शिरोडकर यांच्या विरोधात काँग्रेस सक्षम उमेदवार उभे करून त्यांचा पराभव करेल, असा दावा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला.  आमदार प्रतापसिंह राणे यांनी भाजपची कृती अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर नाराज
 दरम्यान माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या विरोधात निवडून आलेल्या सोपटे यांना भाजप मध्ये प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्या बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.फुटिरांना धडा शिकवून लोकांनी राजकारण स्वच्छ व शुद्ध करावे, अशी तिखट प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे. मांद्रे मतदारसंघातील जनता तर स्वाभिमानी असून त्यांच्याकडून निश्चितच योग्य तो निर्णय घेतला जाईल हे मला सध्या येत असलेल्या विविध फोन कॉल्सवरून स्पष्ट होते, असे पार्सेकर म्हणाले.
सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा व आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटल्यानंतर या दोघांनीही काँग्रेसच्या आमदारकीवर पाणी सोडले. सोपटे हे काँग्रेसतर्फे लढताना मांद्रे मतदारसंघात गेल्या निवडणुकीवेळी पार्सेकर यांचा पराभव करून निवडून आले होते.
पार्सेकर  म्हणाले,  प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी सकाळी मला दिल्लीहून फोन केला व घटना सांगितली. त्यांना काय सांगायचे ते मी सांगितले आहे. पार्सेकर म्हणाले, की लोकांनीच आता फुटिरांना काय ते विचारावे. पाच वर्षांसाठी त्यांना जनतेने निवडून दिले होते. केवळ दीड वर्ष झाल्यानंतर ते का फुटले हे त्यांनीच सांगावे. गोव्याचे राजकारण शुद्ध करण्यासाठी लोकांनी फुटिरांना धडा शिकवावा व लोक शिकवतीलही.
मांद्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळला सोपटेंचा पूतळा
मांद्रे मतदार संघातील संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी सोपटे यांचा पूतळा जाळून आपली नाराजी व्यक्त केली.