सोपटेंचे पुनर्वसन;जीटीडीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

0
1817
गोवा खबर: काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या दयानंद सोपटे यांची गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.विज मंत्री नीलेश काब्राल यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल उशिरा यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. मंत्री काब्राल यांनी आज सोपटे यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी जीटीडीसीची सूत्रे  हाती घेतली.
जनतेमध्ये योग्य संदेश जाण्यासाठीच आपण जीटीडीसीची सूत्रे त्वरित सोपटे यांच्याकडे सोपवली, अशी प्रतिक्रिया यावेळी काब्राल यांनी दिली. गोव्याचे हित राखण्यासाठी तसेच इतर विकासकामे पुढे नेण्यासाठी आपण सोपटे यांना सर्वतोपरी पाठिंबा देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जीटीडीसीची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोपटे यांनी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. गोवा एक प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असून, त्याची लोकप्रियता वाढत जावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सध्या मंजूर झालेली कामे व प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मंत्री नीलेश काब्राल यांचे त्यांनी आभार मानले.
मांद्रे मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार असलेल्या सोपटे यांनी शिरोडयाचे आमदार सुभाष शिरोडकर यांच्या सोबत आमदारकीचा राजीनामा देत दिल्ली येथे भाजप मुख्यालयात भाजप मध्ये प्रवेश केला होता.शिरोडकर यांची नुकतीच आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.सोपटे मागे राहिले होते.आज त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली.