सैन्यभरती मार्गदर्शन शिबिरे गोवाभरात घेणार :अनंत जोशी

0
671
गोवा खबर: भारतीय सैन्यात देशसेवेबरोबरच आकर्षक करियर घडविणाऱ्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गोमंतकीय युवक युवतींचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी गोवाभरात सैन्य भरती मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल गोवा सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी दिली.
 मीरामार युथ होस्टेल सभागृहात आयोजित केलेल्या मासिक कार्य आढावा बैठकीत  ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे चेअरमन कृष्णा शेटकर व सहसचिव अनिल बोंद्रे उपस्थित होते.
जोशी पुढे म्हणाले की, भारतीय सैन्य दलातील भूदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही विभागात शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या तरुण तरुणींसाठी अनेक आव्हानात्मक पदे उपलब्ध आहेत. देशसेवा करण्याबरोबरच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या इथे आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील तरुणांचे संरक्षण दलातील करियरकडे दूर्लक्ष आहे. त्यामुळे खूप संधी असूनही इकडे कोणी वळत नाही. ही उदासीनता घालवण्यासाठी सैनिक कल्याण संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे.
यावेळी वर्षभर करावयाच्या अनेक उपक्रमांवर चर्चा झाली. सैनिक कल्याण संघटनेची स्मरणिका प्रकाशित करणे, दर पंधरवड्यास माजी सैनिकांचा सहकुटूंब मेळावा घेणे, समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करणे, सभासदांना क्रियाशील बनविणे, वृक्ष लागवड, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असे कार्यक्रम घेण्याचे ठरले.
सहसचिव अनिल बोंद्रे यांनी अहवाल वाचन केले. संघटनेचे माध्यम सल्लागार प्रभाकर ढगे यांनी स्मरणिकेचे महत्त्व आणि  रूपरेषा याबद्दल माहिती दिली. कृष्णा शेटकर यांनी अध्यक्षीय समारोप व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि कॕप्टन दत्ताराम सावंत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.