गोवा खबर:भारतीय सैनिक, अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटना व रोटरी क्लब, पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने  7 जानेवारी रोजी सैन्य दिवसनिमित्त ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहूणे म्हणून ब्रिगेडियर ए.के शर्मा उपस्थित असणार आहेत. त्यांच्याहस्तेच स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 7 वाजता बांबोळी येथील ऍथलेटिक्स मैदानावर होणार असल्याची माहीती स्पर्धेचे सचिव अनंत जोशी यांनी दिली.
 यावेळी त्यांच्यासोबत अविनाश परमार, वैभव कळंगुटकर, गिरीश सावंत व भालचंद्र आमोणकर उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 रोजी सेना दिवस साजरा केला जातो,मात्र तो दिवस विविध कार्यक्रमांनी व्यस्त असल्यामुळे रविवारी  7 रोजी ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. भारतीय सैनिकांना निधि स्वरुपात मदत, विरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुंटूंबियांना आधार प्रदान करणे, तसेच पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या स्पर्धेचे मुख्य हेतू आहे. तसेच यावेळी टी-शर्ट पेंटींग स्पर्धा होणार आहे. यावेळी आर्मी बॅण्ड व झुंबा नृत्याचे खास आर्कषण असणार आहे,अशी माहिती  जोशी यांनी यावेळी दिली.
ही स्पर्धा 10 कि.मी व 5 कि.मी अशा दोन विभागात होणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. 10 कि.मी स्पर्धेचा मार्ग बांबोळी येथील ऍथलेटिक्स स्टेडियम, गोवा विद्यापिठ ते ओडशेल जंक्शन व परत, तर 5 कि.मी साठी बांबोळी ऍथलेटिक्स स्टेडियम ते ऑल इंडिया रेडियो व परत असा मार्ग आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून व सैनिकाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
स्पर्धकांनी सकाळी 6 वाजता ठिकाणावर उपस्थित राहावे. स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान वैद्यकिय सुविधा, व नाश्टाची सोय असणार आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहीतीसाठी 9400971250 यावर संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.