सूडबुद्धिने काढलेले बदली आदेश रद्द करा अन्यथा जनतेच्या विरोधास तयार रहा : गिरीश चोडणकर

0
277
गोवा खबर : सत्तरीतील पिकाऊ जमीनीचा  आयआयटीसाठी वापर न करता उद्योगमंत्री विश्वजीत राणे यानी एसईझेड प्रकल्पांसाठी दिलेल्या व सदर प्रकल्प रद्द झाल्यानंतर सरकारकडे परत आलेल्या जागेत हा शैक्षणिक प्रकल्प राबवावा अशी मागणी काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केली आहे.

आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका दिव्यांग महिलेसह इतर सर्वांचे  बदली आदेश सरकारने त्वरीत मागे न घेतल्यास संपुर्ण गोमंतकीयांच्या रोषास सरकारला  सामोरे जावे लागेल असा इशारा चोडणकर यानी दिला आहे.
सुमारे दोन लाख झाडांची कत्तल करुन आयआयटी प्रकल्प उभा करण्यापेक्षा सरकारने, सेझसाठी दिलेली पडिक जमीन वापरात आणावी असे  चोडणकर यानी म्हटले आहे.
चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी बघ्याची भूमिका न घेता, सत्तरीतील ग्रामस्थांवर झालेली पोलीस दादागीरी व पर्यावरणाचा नाश करणारा प्रकल्प यावर भाष्य करणे गरजेचे आहे.
काॅंग्रेस पक्ष जनतेसोबत असुन, आमची भूमिका आम्ही मेळावली येथे ग्रामस्थांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन जाहिर केली आहे,असे सांगून चोडणकर म्हणाले,वनराई व  निसर्ग हेच सत्तरीचे वैभव आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांनी हे वैभव नष्ट होणार नाही याची जबाबदारी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एखादा प्रकल्प दोन-चार वर्षात उभारणे सोपे असते, परंतु निसर्गाचा समतोल राखणे व नष्ट झालेली वनराई परत उभी करण्यास अनेक वर्षे लागतात याचे भान  राणे यानी ठेवावे.
सत्तरीचे भूषण व काॅंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे हे नेहमीच आपण शेतकरी असल्याचे अभिमानाने सांगतात व आजही ते शेती व्यवसाय आत्मियकेने करतात. त्यांचा आदर्श समोर ठेऊन, सत्तरीच्या शेतकऱ्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकीयांचे कर्तव्य आहे,याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.
सरकारने कृषी क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी तत्पर सेवा देणे तसेच त्यांच्या भावनांचा आदर राखणे गरजेचे  आहे. सरकारने दादागीरी व हुकूमशाही न करता स्थानीक सत्तरी वासीयांच्या भावनांची कदर करावी.वडिलोपार्जीत पुण्याईवर जगणाऱ्या, आपला पाय एके ठिकाणी कधीच न ठेऊ शकणाऱ्या, अतीमहत्वाकांक्षा यामुळे  नेहमीच चंचल असलेल्यांचा सल्ला न घेता व त्यांच्या हातचे बाहुले न बनता सत्तरीच्या लोकांनी जो आपल्या मातीसाठी आवाज उठविला तो अभिनंदनीय असुन, त्यांचा हा लढा संपुर्ण गोमंतकीयांच्या पाठिंब्याने पुढे जाणार आहे,असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या, बंगल्यात राहणाऱ्या व खेड्यातील राहणीमान व परिस्थीतीचा अजिबात अंदाज नसलेल्या नेत्याच्या सल्ल्याने आपल्याच लोकांच्या विरूद्ध बोलणारे पंच, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष अशा लोक प्रतिनीधीनी व्यक्तिगत स्वार्थ न पाहता पुढिल पिढीच्या भवितव्याचा विचार करावा अशी मागणी चोडणकर यानी केली आहे.