सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘पार्टीकल्स’ चित्रपटाला तर मराठमोळ्या  उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार

0
981

सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘पार्टीकल्स’ चित्रपटाला

 

गोवा खबर:ब्लेझ हॅरिसन दिग्दर्शित आणि एस्टेल फियालॉन निर्मित ‘पार्टीकल्स’ या चित्रपटाने 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे.तर ‘माई घाट: क्राईम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तीरेखेसाठी मराठमोळ्या  उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या महोत्सवाचा आज समारोप झाला. 40 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांचा या पुरस्कारात समान वाटा आहे. पौंगाडावस्थेतील मुलांचा प्रवास आणि त्यायोगे भौतिकशास्त्राच्या मदतीने पलिकडच्या जगाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रवास याचे चित्रण या चित्रपटात आहे.  संयत चित्रांकनासाठी या चित्रपटाचे परीक्षक मंडळाने कौतुक केले.

‘जल्लिकट्टू’ चित्रपटासाठी  लिजो जोस पेल्लिसेरी यांनी पटकावला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार

‘जल्लिकट्टू’ या चित्रपटासाठी  लिजो जोस पेल्लिसेरी यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे स्वरुप रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 15 लाख रुपये असे आहे. हा मल्याळम चित्रपट आहे. दुर्गम गावातील एक बैल गावातून पळून जातो आणि त्यातून हिंसा उद्‌भवते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.  या चित्रपटातील ‘कोरिओग्राफीचे’ परीक्षक मंडळाने कौतुक केले.

सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार

ब्राझीलचा चित्रपट ‘मारीघेला’ या चित्रपटातील कार्लोस मारीघेलाच्या भूमिकेसाठी सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हुकूमशाहीच्या काळातील शक्तीशाली आणि प्रभावी व्यक्तीरेखा जॉर्ज यांनी साकारली आहे.

उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार

‘माई घाट: क्राईम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तीरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे.

रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये प्रत्येकी असे सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराचे स्वरुप आहे.

विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या ‘बलून’ चित्रपटाला

इफ्फी महोत्सवात यंदा विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या ‘बलून’ या चिनी चित्रपटाने पटकावला. या चित्रपटातील चित्रीकरणाच्या सौंदर्याचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘अबू लैला’ आणि ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटांसाठी अमीन सिदी बौमेदिने आणि मॉरिस अल्टेनू यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

‘अबू लैला’ आणि ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटांसाठी अमीन सिदी बौमेदिने आणि मॉरिस अल्टेनू यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार विभागून देण्यात आला. एका दहशतवाद्याच्या शोधात वाळवंट ओलांडणाऱ्या दोघा बालमित्रांची गोष्ट ‘अबू लैला’ चित्रपटात आहे. तर 24 तासात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमधील एका जोडप्याच्या नात्यामधले नाट्य ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटात आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘हेल्लारो’ चित्रपटाला विशेष पुरस्कार

अभिषेक शहा दिग्दर्शित ‘हेल्लारो’ या चित्रपटाला परिक्षकांकडून विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपटातील संगीत आणि कोरिओग्राफीचे कौतुक परीक्षकांनी केले. चित्रपटात मांडण्यात आलेला महिला सबलीकरणाचा विषय आजच्या काळाशीही सुसंगत असल्याचे परीक्षकांनी सांगितले.

‘रवांडा’ चित्रपटाला आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक

रिकार्डो सालवेट्टी दिग्दर्शित ‘रवांडा’ या चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक पटकावले आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल काऊंसिल फॉर फिल्म टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.

आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक विशेष पुरस्कार संजय पी सिंग चौहान दिग्दर्शित ‘बहत्तर हूरे’ या चित्रपटाला देण्यात आला.

Best Film Award being presented to film ‘Particles’ directed by ‘Blaise Harrison’, at the closing ceremony of the 50th International Film Festival of India (IFFI-2019), in Panaji, Goa on November 28, 2019.