सुवर्णमहोत्सवी इफ्फीचा आज समारोप 

0
952
संगीतकार इलिया राजा यांना जीवनगौरव पुरस्कार
गोवा खबर : २० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीचा समारोप आज दुपारी ३ वाजता बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. समारोप सोहळ्यात सुवर्णमयूराचा मानकरी कोण ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रख्यात संगीतकार इलिया राजा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोप सोहळा रंगणार आहे.
‘डिस्पाइट ऑफ फोग’ या सिनेमाने २० नोव्हेंबर रोजी इफ्फीचा पडदा उघडला होता. महानायक अमिताभ बच्चन, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या हजेरीने उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढली होती. रजनीकांत यांना गोल्डन ज्युबली आयकॉन ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात आले होते. संगीतकार हरी हरन यांच्या फ्युजनने उपस्थित प्रतिनिधी मंत्रमुग्ध झाले होते. यावर्षी राज्यातील बहुतेक रवींद्र भवनांमध्ये इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर गेले आठ दिवस ७६ देशांमधील ३०० सिनेमांचा आस्वाद देश-विदेशांतून आलेल्या १० हजार १९० प्रतिनिधींनी घेतला आहे.
अनिल कपूर, तापसी पन्नू, फराह खान, सुभाष घई, करण जोहर, संतोष जुवेकर, तिस्का चोप्रा, नीना कुलकर्णी आदी कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांनी इफ्फीमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत प्रतिनिधी सोबत संवाद साधला.
जुन्या गोमेकॉसमोर कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले आर्ट पार्क लक्षवेधी ठरले. ठिकठिकाणच्या रवींद्र भवनांबरोबरच पणजी येथे चिल्ड्रन पार्कबरोबरच मीरामार किनारा आणि जॉगर्स पार्कमध्ये स्थानिक लोकांसाठी लोकप्रिय सिनेमांचे प्रदर्शन करण्यात आले होते. यंदा प्रथमच सांगेमध्ये इफ्फीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
यंदा पेपरलेस तिकीट व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिनिधीचे कार्ड स्कॅन केल्यानंतर त्यांनी नोंदणी केलेल्या तिकिटाची माहिती एसएमएस आणि ईमेलवर दिली जात होती. त्यासाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष नोंदणी असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आले होते. प्रतिनिधींनी पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करू नये यासाठी खास गाडे उभारून त्यावर काचेच्या बाटल्यांमधून पाणी पुरवले जात होते.