सुरक्षा रक्षकांचा दीक्षांत सोहळा संपन्न

0
693

गोवा खबर:वाळपई सत्तरीच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात तीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या एकूण २०३ सुरक्षा रक्षकांच्या आठव्या तुकडीचा काल दीक्षांत सोहळा पार पडला.

  प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर झालेल्या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत हजर होते. डॉ. सावंत यांनी सुरक्षा रक्षकांच्या दीक्षांत संचलनाचे निरीक्षण  करून मानवंदना स्विकारली.

 गोवा मानव संसाधन महामंडळाने निवड केलेल्या सुरक्षा रक्षकांना वाळपईच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात इनडोअर आणि आऊटडोअर कामाचे प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षण केंद्रात आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करणारी सुरक्षा रक्षकांची ही आठवी तुकडी आहे.

यावेळी बोलताना डॉ. सावंत यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी सुरक्षा रक्षकांनी आपले शिक्षण आणि ज्ञान वाढवण्याचा सल्ला दिला आणि ज्या प्रकारे गृह खात्याने खास करून गृह रक्षकांसाठी राखीव कोटा ठेवला आहे तसाच कोटा मानव संसाधन महामंडळाखाली काम करणार्‍या सुरक्षा रक्षकांनाही असावा अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या मानव संसाधन महामंडळाने वेगवेगळ्या सरकारी खात्यांना सुमारे १५०० सुरक्षा रक्षक आणि सुमारे ६०० हाऊसकिपिंग कर्मचार्‍यांची भरती केली आहे. डॉ. सावंत यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण काळात शिकवलेली शिस्त आपल्या जिवनात कायम ठेवण्यास सांगितले.

मानव संसाधन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  मधुकर फळ यांचेही यावेळी भाषण झाले.

उत्कृष्ट सुरक्षा रक्षक म्हणून  विशाल वेळीप (आऊटडोर),  योगश नाईक (इनडोअर),  शुभम नाईक (ऑलराऊंडर) यांना यावेळी पदक देण्यात आले.

सुरवातीला पोलिस अधिक्षक आणि पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बॉस्को जॉर्ज यांनी मान्यवरांचे स्वागत केले उपप्राचार्य  गुरूदास गावडे यांनी शेवटी आभार मानले.

मानव संसाधन महामंडळाचे सरव्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) . ऑस्टिन कुलासो हेसुद्धा दीक्षांत सोहळ्यास हजर होते.