सुपरस्टार रजनीकांत यांना “आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी” पुरस्कार जाहीर

0
526

 

गोवा खबर:केंद्र सरकारने पहिल्यांदाच इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात “आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी” या विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे. इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिला जाणारा हा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते एस रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. “भारतीय चित्रपट सृष्टीला गेली अनेक दशके दिलेल्या अमूल्य योगदानाची आदरपूर्वक दखल घेत, “आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी 2019” हा पुरस्कार सुपरस्टार अभिनेते  एस रजनीकांत यांना जाहीर करताना मला विशेष आनंद होत आहे.” असे जावडेकर यांनी म्हंटले आहे

सुतार-पोर्टर-बस कंडक्टर अशी आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांचा अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्यापर्यतचा प्रवास एखाद्या अद्भुत, रंजक चित्रपट कथेइतकाच विलक्षण आहे.

12 डिसेंबर 1950 रोजी  कर्नाटकात एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी अनेक छोटी-मोठी कामे, नोकऱ्या केल्या. बंगरूळू येथे कर्नाटक एस टी महामंडळात त्यांनी बस कंडक्टर ची नोकरीही केली. त्याच काळात नाटकात कामे करत असताना त्यांच्यातल्या सुप्त अभिनेत्याला वाव मिळाला आणि त्यांची अभिनयाची आवड बहरली.

आज भारतात लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या रजनीकांत यांना त्यांची पहिली भूमिका ‘पुटन्ना कानागल’ यांनी दिग्दर्शित केलेला कानडी चित्रपट कथा संगम मध्ये मिळाली. त्यानंतर के बालचंदर यांचा  तमिळ चित्रपट ‘अपूर्व रागंगल’ (1975) मध्ये त्यांनी एका कर्करोग ग्रस्त व्यक्तीची भूमिका साकारली होती.या चित्रपटात प्रमुख भूमिका अभिनेता कमल हासन यांची होती, जे नंतर त्यांचे जवळचे मित्रही झाले. या चित्रपटातली रजनीकांत यांची भूमिका खूप गाजली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

त्यांच्या दीर्घ आणि नाट्यपूर्ण कारकीर्दीत, रजनीकांत यांनी विविध भाषांमधल्या 170 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यात तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. ‘ब्लड स्टोन’ या हॉलीवूडपटाही त्यांनी भूमिका केली आहे.

भारत सरकारने 2000 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 45 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात (2014) त्यांना “भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्ती म्हणून शतकवर्षपूर्ती पुरस्कार देण्यात आला.

2019 हे वर्ष इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षातल्या महोत्सवात, 76 देशांतील 200 सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पैनोरामा क्षेत्रात 26 फिचर फिल्म्स आणि 15 माहितीपट दाखवले जातील. 10,000 पेक्षा जास्त चित्रपट रसिक या महोत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.