सुधीर कांदोळकरांचा भाजपला राम राम!

0
846

गोवा खबर:भाजपची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर म्हापशाचे नगरसेवक  सुधीर कांदोळकर यांनी भाजपचा राजीनामा देऊन आपल्या 350 कार्यकर्त्यांसमवेत रविवारी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर मागोचे सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष विनोद (बाळू) फडके यांनीही आपले समर्थन काँग्रेस पक्षाला दिले आहे.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार नीळकंठ हळर्णकर, आलेक्स रेजिनाल्ड, ऍड. रमाकांत खलप, विजय भिके, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत कांदोळकर यांनी पत्र देऊन रितसर काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, नीळकंठ हळर्णकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कांदोळकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे हा पक्ष बळकट झाला असून म्हापशातून सुधीर कांदोळकर यांचा विजय आता निश्चित झाला असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.

सुधीरने आजवर प्रामाणिकपणे काम केले आहे. भाजपात एकटा हुकुमशाहीने निर्णय घेतो. तसे काँग्रेस पक्षात नाही. सुधीरच्या बरोबर काँग्रेस प्रवेश केला त्या सर्वांचे पक्षात स्वागत आहे. काँग्रेस पक्ष सर्वांसाठी खुला आहे. येथे येऊन तुम्ही तुमचे प्रतिनिधित्व सांभाळावे, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.