सुधा मूर्ती यांच्या दोन साहित्यकृतींचा सुनेत्रा जोग यांच्याकडून कोकणीत अनुवाद

0
994

गोवा खबर:परोपकारी, उद्योजक, लेखक आणि संगणक शास्त्रज्ञ सुधा मूर्ती यांच्या दोन प्रमुख साहित्यकृतींचा सुनेत्रा जोग यांनी केलेल्या अनुवादांनी कोकणी जगतात आणखी दोन पुस्तकांची भर पडली आहे. 

नुकतीच अनुवादित केलेली ही पुस्तके हियर, देयर अँड एव्हरीव्हेयर (हांगा, थंय आनी वचत थंय) आणि थ्री थावजंड स्टिचीस (तीन हजार टांके) अशी आहेत.

सुधा मूर्ती (69) इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत. कर्नाटकस्थित असलेली ही ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था  1996 मध्ये समाजातील वंचितांच्या मदतीसाठी आयटी पॉवरहाऊस इन्फोसिसने स्थापन केली होती.

ही संस्था शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, कला आणि संस्कृती आणि निराधारांची काळजी घेणे हे कार्य करते. सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.

तीन हजार टाके या पुस्तकाचे वर्णन ‘भारतातील सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या महिला लेखिकेच्या ‘धैर्य आणि श्रद्धा यांची हृदयस्पर्शी कहाणी’ असे केले गेले आहे.

दोन दशकांपूर्वी, जेव्हा सुधा मूर्ती यांनी त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा दृढ निश्चय केला आणि पहिल्यांदा देवदासींच्या गटाकडे संपर्क साधला तेव्हा त्यांनी मूर्तींवर चप्पल फेकले. पण त्याचा विचार न करता त्या परत त्यांच्याकडे गेल्या आणि एड्सच्या धोक्यांविषयी त्यांनी देवदासींशी बोलणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी टॉमेटो फेकले. पण मूर्तींनी हार मानली नाही.

इन्फोसिस फाउंडेशनने देवदासींना स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्यावरील सामाजिक कलंकाचा शिक्का दूर करण्यासाठी कठोर परिश्रम केले.

कर्नाटक राज्यात आज मंदिरात देवदासी शिल्लक नाहीत. ही शक्तिशाली, प्रेरणादायी कथा हजारो लोकांचे जीवन बदलणाऱ्या त्या बदलांच्या पुढाकाराविषयी सांगते.

त्यांच्या हिअर, देअर अँड एव्हरीव्हेअर या पुस्तकातून सुधा मूर्ती – काल्पनिक कथा,  मुलांची पुस्तके, प्रवासवर्णने आणि तांत्रिक पुस्तके असे विविध प्रकार आणि भाषा- आपल्या 200 व्या पुस्तकाचा टप्पा गाठत आहेत.

यात त्यांनी चिंतनशील प्रस्तावनेसह त्यांना भावलेल्या विविध संग्रहातील जुन्या आणि काही नव्या कथांचा समावेश केला आहे.

सुनेत्रा जोग यांनी या पुस्तकांचे भाषांतर केले आहे. याआधी त्यांनी सुधा मूर्ती यांच्या पाच पुस्तकांचे इंग्रजीतून कोकणीत भाषांतर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मालती राव यांच्या डिसऑर्डरली वुमन या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे भाषांतर कोकणीमध्ये केले आहे. प्रिया छाब्रिया यांच्या जनरेशन 14 चे आणि शिव खेरा यांच्या यू कॅन अचिव्ह मोअर चे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे.

जोग म्हणाल्या की ही पुस्तके कोंकणी वाचकांपर्यंत पोहोचावीत अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्या ही पुस्तके प्रकाशित करण्यास उत्सुक आहेत.

पेपरबॅक 160 आणि 188 पानांच्या या पुस्तकांची किंमत 200 रुपये असून ती वर्षा बुकस्टॉल, ब्रॉडवे बुक हाऊस(पणजी), गोवा कोंकणी अकादमी व इतर दुकानांत उपलब्ध आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक गोवा 1556 हे आहेत.