सीकेरी किनाऱ्यावरील खडकाळ भागात 2 मृतदेह सापडले

0
1138
गोवा खबर:कळंगुटपासून काही अंतरावर असलेल्या सीकेरी किनाऱ्यावरील खडकाळ भागात 2 मृतदेह सापडले असून ते अकोला येथील त्या दोन तरुणांचे असण्याची शक्यता आहे.कळंगुट पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी त्या तरुणांच्या कुटुंबीयांना पाचारण केले आहे.11जून रोजी सकाळी अकोला येथील 5 तरुण कळंगुट येथे समुद्र स्नानासाठी उतरले असता वाहून गेले होते.त्यातील तिघांचे मृतदेह सापडले होते तर दोन मृतदेहांचा शोध सुरु होता.
अकोला येथील  कळंगुट समुद्रात बुडालेल्या त्या दोन तरुणांचा शोध गेले 3 दिवस सुरु होता. नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानां सोबत कळंगुट पोलिस शोधकार्यात सहभागी झाले होते.आज सायंकाळी उशिरा शोधमोहिम सुरु असताना 2 मृतदेह सीकेरी किनाऱ्यावरील खडकाळ भागात अडकलेले आढळून आले आहेत.
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या  (मोठी उंबरी-अकोला, महाराष्ट्र) येथील 14 जणांच्या गटातील प्रितेश लंकेश्‍वर गवळी (वय 32) या पोलिस कॉन्स्टेबलसह त्याचा भाऊ चेतन  (27) तसेच उज्ज्वल प्रकाश वाकोडे (25), किरण ओमप्रकाश म्हस्के व शुभम गजानन वैद्य हे पाचजण सोमवारी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास कळंगुट समुद्रात स्नानासाठी उतरले असता बुडाले होते. बुडालेल्यांपैकी किरण व शुभम  हे दोघे  बेपत्ता असून त्यांचा   शोध सुरू होता.आज सापडलेले मृतदेह त्यांचेच आहेत का याची अजुन खातरजमा झालेली नसल्याचे कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले आहे.